दीपनगरातील कर्मचार्यांना त्वरीत कामावर घ्या अन्यथा 7 रोजी जनआंदोलन
वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांचा दीपनगर प्रशासनाला इशारा
भुसावळ : दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रात श्री साईरेल कंपनीमध्ये 10 वर्षापासून 20 कर्मचारी नोकरी करीत असताना कोरोनाच्या काळात कंपनीने 20 कर्मचार्यांना कामावरून काढल्याने कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली. दोन महिन्यांपासून कर्मचारी वारंवार वीज निर्मितीच्या मुख्य अभियंत्याकडे जाऊन सुद्धा उपयोग होत नसल्याने शुक्रवारी कर्मचार्यांनी वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची भेट घेउन न्यायाची अपेक्षा व्यक्त केली.
तर आंदोलनाचा इशारा
प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, प्रवीण ढवळे, संजयकुमार जैन, शामराव धनगर, हितेश चौधरी, संदीप भोई, गोलू निंबाळकर, कमलाकर मराठे, तेजस जैन, लखन माळी, संजय बेदरकर, मनोज देवगिरकर, शंकर पवार, आकाश निमकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मुख्य अभियंता राजू घुगे पाटील यांची भेट घेतली. कोरोना काळात कर्मचार्यांना कामावरून कमी करू नये, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आदेश असतानाही दीपनगर वीज निर्मिती केंद्र आदेश पाळत नसल्यास ही बाब योग्य नाही, कामावरून कमी केलेल्या कर्मचार्यांना त्वरीत कामावर घेण्यात यावे तसेच वरणगाव शहरातील तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे यासाठी नवीन प्रकल्पात काम द्यावे, राख वितरणात मोठा घोळ झाला असून ज्यांना आवश्यकता नसतांना त्या कंपनीच्या नावाने राख उचलली जाते आणि दलाल बाहेर जास्त भावाने विक्री करीत आहेत. राखेच्या घोटाळ्याची तत्काळ चौकशी करावी अन्यथा 15 दिवसात भारतीय जनता पार्टीतर्फे कर्मचार्यांना सोबत घेवून तीव्र स्वरूपाचे आंदोलन 7 डिसेंबर रोजी केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान अप्रिय घडल्यास त्यास दीपनगर वीज निर्मिती केंद्र जबाबदार राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रति माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे यांना सादर करण्यात आल्या आहेत.

