भुसावळ तालुका भाजपामुक्त करणार : माजी आमदार संतोष चौधरी


वरणगावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा

भुसावळ : राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी असून भुसावळ तालुक्यातील येणार्‍या निवडणुकांमध्येदेखील महाविकास आघाडीची सत्ता येणार असून वरणगाव व भुसावळ नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार असून 27 ग्रामपंचायतीमध्ये भाजप मुक्त महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करणार असल्याचा आशावाद भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी येथे व्यक्त केला. वरणगाव पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.

विकासकामे करताना गुणवत्तेकडे लक्ष द्या
माजी आमदार चौधरी म्हणाले की, वरणगाव नगरपालिकेत 18 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असतील तसेच भुसावळ शहराची अवस्था बघितली तर अत्यंत दयनीय झाली असून विना डांबराचे रस्ते करण्यात येत आहे तसेच विकासकामे करताना गुणवत्तेकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. चांगल्या गुणवत्तेच्या कामांनी वरणगाव शहराचा विकास करणार असल्याचे प्रतिपादन करत भुसावळ तालुका भाजप मुक्त तालुका करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. येणार्‍या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनवर लक्ष ठेवावे लागेल यासाठी कार्यकर्त्यांनी जागृत राहायचे आहे तसेच सामान्य कार्यकर्त्याला सन्मानपूर्वक वागणूक देत त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली असून हिंदुत्वाच्या मुद्यावर मंदिरे उघडे करा म्हणणार्‍यांनी मंदिरातील तिजोर्‍या देखील गरीबांसाठी उघड्या कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, महाराष्ट्र अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष, राजेंद्र चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, सुधाकर जावळे, नाना पवार, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, संतोष माळी, नितीन धांडे, उल्हास पगारे, माजी नगराध्यक्ष अरुणा इंगळे, नंदा निकम, रोहिणी जावळे, दुर्गेश ठाकुर, उल्हास पगारे व मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष माळी तर आभार गजानन वंजारे यांनी मानले.

माजी मंत्री एकनाथराव खडसेंची अनुपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रवेश केल्यानंतर पहिलाच कार्यकर्ता मेळावा वरणगावात झाला. या मेळाव्याला खडसे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करतील या आशेने जुने व राष्ट्रवादी प्रवेश केलेले भारतीय जनता पार्टीचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते परंतु या बैठकीला खडसे अनुपस्थित राहिल्याने त्याचीही चर्चा होताना दिसली.

तिकीट वाटपासाठी समिती : अ‍ॅड.पाटील
अ‍ॅड.रवींद्र पाटील म्हणाले की, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमीच सर्वसामान्य न्याय देत धर्मनिरपेक्ष कार्य केले आहे. येणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीत एकत्र होऊन या ठिकाणी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करायचे आहे त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये तिकीट वाटपासाठी समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती माझ्याकडे तसेच माजमी आमदार संतोष चौधरी व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे अहवाल सादर सादर करेल त्यानंतर तिकीट वाटप केले जाईल व हा आदेश सर्वांनी पाळायचा आहे, असेही ते म्हणाले.

विकास कामांना विरोध नाही : राजेंद्र चौधरी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी म्हणाले की, शिवारातील विकासासाठी नेहमीच मदत केलेली आहे. शहरात काँक्रिटीकरणवर डांबरीकरण केले असून आठ कोटी रुपयांचया पाणीपुरवठा योजनेचे 13 कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले तरीदेखील शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.

देश सर्वांचाच : गफ्फार मलिक
अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक म्हणाले की, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल हे म्हणत असले तरी हे राज्य कुणाचे नाही तर ते सर्वसामान्यांचे आहे. देशामध्ये शेतकरी विरोधी कायदे केले जात आहे. सर्वसामान्यांना त्रास होत आहे, भारत देश सर्वांचा आहे त्यामुळे याची एकात्मता राखली जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे व येणार्‍या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळेल, असेही मलिक म्हणाले.

विकासकामांचा देखावा : वाय.आर.पाटील
राष्ट्रवादीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील यांनी शहरातील विकासकामांचा खरपूस समाचार घेतला. विकासकामांच्या नावाखाली नागरीकांच्या डोळ्यांमध्ये धूळफेक केली जात असून काँक्रिटीकरण निकृष्ट झाल्याने त्यावर डांबरीकरण केले आहे व इतरांना कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीत डावलले जाते याबाबत सविस्तर त्यांनी विवेचन केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !