रावेरात कत्तलीच्या इराद्याने बैलांची वाहतूक ; 21 गुरांची सुटका
रावेर पोलिसांनी आयशर वाहन केले जप्त : वाहन चालक पसार
रावेर : कत्तलीच्या इराद्याने 21 बैलांची आयशरमध्ये वाहतूक होत असताना रावेर पोलिसांनी सतर्कतेने वाहन जप्त करीत 21 बैलांची सुटका केली. तालुक्यातील कोंद फाट्याजवळ शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास आयशर (एम.प.08 जी.ए.1679) या क्रमांकाच्या वाहनातून 21 बैलांची अतिशय दाटीवाटीने वाहतूक होत असताना रावेर पोलिसांनी कारवाई करीत बैलांची सुटका केली तसेच जखमी अवस्थेतील बैलांना पोलिस कर्मचारी सुरेश मेढे यांच्या माध्यमातून जळगाव येथील बाफना गो शाळेत हलवण्यात आले तर आयशर चालक मात्र पसार होण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी रावेर पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोललिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नितीन डांबरे करीत आहेत.

