भुसावळमधील कोरोना सेंटर कार्यान्वित ठेवावे
प्रा.धीरज पाटील : दुसरी लाट आल्यास होईल गैरसोय
भुसावळ : महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना या वैश्विक महामारीला राज्यात नियंत्रीत करण्यासाठी यशस्वी नियोजन केले असताना दुसरीकडे आता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतांना भुसावळातील ग्रामीण रुग्णालय, ट्रामा केअर सेंटरमधील कोविड सेंट रबंद करण्यात आल्याने हे सेंटर कार्यान्वीत करावे, अशी मागणी प्रा.धीरज पाटील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीपकुमार व्यास यांच्याकडेही निवेदनाद्वारे केली आहे.
रुग्ण संख्या वाढत असताना प्रशासनाची वाढेल चिंता
प्रा.पाटील यांच्या निवेदनानुसार कोविड सेंटरमुळे गोरगरीब रुग्णांवर योग्य उपचार झाले तर मधल्या काळात रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोविड रुग्णालय बंद करण्यात आले ते ठीक होते मात्र हल्ली दररोज भुसावळातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यातच भुसावळातील कोविड सेंटर बंद करण्यात आल्याने असुविधा निर्माण झाली आहे. काही दिवसांत आणखी रुग्ण वाढले तर प्रशासनाचीच चिंता वाढणार आहे. भुसावळ हे कॉस्मोपॉलीटीन शहर असून येथे रेल्वेचे जंक्शन स्थानक आहे तसेच अत्यंत वर्दळीचा आशिया महामार्ग क्र. 46 ही शहरातून जातो. आसपासच्या परीसरातील जनतेला वैद्यकीय सेवेसाठी भुसावळ चांगला पर्याय व आसरा आहे त्यामुळे शहर व तालुक्यातील कोविड सेंटर कोरोना संकट टळल्याशिवाय जनहितासाठी कोविड सेंटर बंद करु नये, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. कोविड सेंटर पूर्ववत सुरू होण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे पाठपुरावा करू, असे प्रा.धीरज पाटील यांनी कळविले आहे.

