कोविडच्या काळापर्यंत कंत्राटी कामगारांना पुर्ननियुक्ती द्यावी
कंत्राटी कामगारांनी मांडले भाजप वैद्यकीय आघाडीकडे गार्हाणे
भुसावळ : शहर व तालुक्यातील कोविड 19 अंतर्गत कार्यरत असणार्या कंत्राटी कर्मचार्यांनी भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि.तु. पाटील यांची वरणगावात भेट घेत गार्हाणे मांडले. कार्यकाळ संपुष्टात आल्याने या कंत्राटी कर्मचार्यांना उस्मानाबाद व सांगली जिल्ह्याच्या धर्तीवर पूर्ननियुक्ती द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजी चव्हाण यांनी कोविड अंतर्गत कार्यरत असणार्या कंत्राटी कर्मचार्यांची सेवा 30 नोव्हेंबरला संपुष्टात येत असल्याबाबत आदेश काढले होते शिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव, चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर, उपजिल्हा रुग्णालय, विमानतळ जळगाव, जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा वाँर रूम जळगाव येथे कार्यरत असलेल्या कंत्राटी आरोग्य सेवकांना 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
भुसावळात कोविड सेंटर बंदने गैरसोय
भुसावळातील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर हे बंद करण्याचे आदेश असल्याने येथील सर्व 21 आरोग्यसेवक, डॉक्टर, वॉर्डबॉय, सिस्टर, डाटा ऑपरेटर आदींचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे त्यांनी वरणगाव येथे डॉ.नि.तु.पाटील यांची भेट घेत आपले म्हणणे मांडले. यावेळी डॉ.नि.तु.पाटील यांनी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य संयोजक डॉ.अजित गोपछडे आणि जळगाव ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्यासोबतच चर्चा केली. जळगाव नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील कंत्राटी पद्धतीने रुजू झालेल्या सर्व आरोग्यसेवकांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी दिला.
अन्यथा धडक मोर्चा
मध्य प्रदेश सरकारने तेथील सर्व कंत्राटी आरोग्य सेवकांना 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे त्याच प्रमाणे राज्यातील उस्मानाबाद, सांगली आदींसह अनेक जिल्ह्यात मुदतवाढ आहे यामुळे जिल्हा प्रशासनाने कंत्राटी सेवकांच्या मुदतवाढीचा निर्णय सात दिवसात घ्यावा. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा डॉ.नी.तू.पाटील यांनी दिला आहे.

