यावलमध्ये ‘पेहरन-ए-शरीफ’ मिरवणुकीला प्रारंभ
यावल- शहरात शनिवारी सायंकाळी ‘पेहरन-ए-शरीफ’ मिरवणुकीला शनिवारी दुपारी तीन वाजता डांगपुरा, मण्यारपुरा भागातून प्रारंभ झाला. या उत्सवाला सुमारे 100 वर्षांची परंपरा आहे. उर्दू वर्षानुसार मोहरमच्या 14 तारखेला हा उत्सव साजरा केला जातो. यावेळी सय्यदना गौसेआजम दस्तगीर यांचे पेहरन म्हणजेच तब्बरूकचे (पवित्र वस्त्र) दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली. यंदाच्या उत्सवाचे आयोजन बाबूजी पुरा उत्सव समितीने केले आहे.
पवित्र वस्त्राच्या दर्शनासाठी गर्दी
शहरातील नजमोद्दीन अमीरोद्दीन यांनी बगदाद येथील सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन आणले होते. त्यास तब्बरूक (पवित्र वस्त्र) असे म्हणतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथे या पवित्र वस्त्राची सजवलेल्या डोलीतून वाद्याच्या गजरात धार्मिक गीत (नाते पाक) गात मिरवणूक काढण्याची प्रथा असून शनिवारी दुपारीही ‘पेहरन-ए-शरीफ’ मिरवणुकीला डांगपुर्यातून प्रारंभ झाला. मिरवणुकीत नवस पूर्ण होतो, अशी भाविकांची धारणा असल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली. जिल्ह्यासह मंबई, मालेगाव, बर्हाणपूर, सूरत, खंडवा येथील भाविक शहरात दाखल झाले आहेत. उत्सव समिती अध्यक्ष मोहंमद हकीम मोहंमद याकूब, तर कुस्ती दंगल समितीचे अध्यक्ष शकील खान जमशेर खान, खजिनदार अयुब खान फजलुर्रहमान खान, सचिव युनूस खान युसूफ खान व सहसचिव सईद खान फरीद खान आदी यशस्वीतेसाठी परीश्रम घेत आहेत. दरम्यान, रविवारी दुपारी तीन वाजता हडकाई नदीपात्रात कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे.