नंदुरबार जिल्ह्यातील समस्यांबाबत नीती आयोग सीईओंना साकडे
लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदेसह शिष्टमंडळाने घेतली भेट
नंदुरबार : जिल्ह्याला केंद्र शासनाच्या नीती आयोगाचे सीईआ अमिताभ कांत यांनी आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी भेट दिल्यानंतर लोकसंघर्ष मोर्च्याच्या वतीने प्रतिभा शिंदे व गणेश पराडके यांनी जिल्ह्यातील विकासासंदर्भातील समस्या त्यांच्याकडे मांडल्या. प्रसंगी खासदार हिना गावीत, जिल्हाधिकारी भारुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा उपस्थित होते.
या समस्यांबाबत झाली चर्चा
जिल्ह्यातील रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबण्यासाठी सीएफआरच्या माध्यमातून ज्या गावांना सामूहिक वनहक्क मिळाले आहेत त्यांच्या माध्यमातून स्थानिक रोजगारासाठी नियोजन करण्यात यावे, तोरणमाळ ग्रामपंच्यायतीमधील गावांच्या सामूहिक वन व्यवस्थापन समितींच्या माध्यमातून पर्यटन स्थळ विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा, नर्मदेतून मिळालेले 10 टीएमसी व तापीतून मिळालेले 5 टीएमसी पाणी उचलून अक्कलकुवा, धडगांव, शहादा व तळोदा तालुक्यातील सिंचन व पाण्याचा प्रश्न सोडवला जावा, आदिवासी जिल्हा म्हणून या जिल्ह्यात बाहेरून विविध स्वयंसेवी संस्था येत असतात त्यांच्या कामाचे जिल्ह्यातील अनुभवी कार्यकर्त्यांसह जिल्हा प्रशासनाने सनियंत्रण करावे, आकांक्षीत जिल्हा म्हणून या जिल्ह्यातील कुपोषण व स्थलांतराचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष पॅकेज तयार करून त्याची लोकसहभागातून अंमलबजावणी केली जावी आदी मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली तसेच जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने लोक संघर्ष मोर्चा या बाबतीत पुढाकार घेईल व या जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमी तत्पर राहील, असेही या वेळी प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.