गंभीर आरोपांमुळे गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही : देवेंद्र फडणवीस
मुंबई : डीजी दर्जाचा अधिकारी इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप करत असून गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलात धक्कादायक घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होत आहेत. पण ही घटना म्हणजे या प्रकरणातला कळस असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप अतिशय गंभीर आहेत त्यामुळे त्यांना मंत्री पदावर राहण्याचा नैतीक अधिकार उरत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्यास सांगितल्याचा खळबळजनक आरोप करून त्यांना थेट मुख्यमंत्र्यांना आठ पानी पत्र लिहिल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
हे देखील वाचा- गृहमंत्र्यांकडून वाझेंना महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट !


फडणवीस म्हणाले, गंभीर प्रकाराची व्हावी चौकशी
या संपूर्ण आरोपींची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी व्हायला हवी. राज्य सरकारला केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणारी चौकशी मान्य नसल्यास न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. डीजी म्हणून काम करत असलेल्या अधिकार्यानं केलेले आरोप गांभीर्यानं घ्यायला हवेत. याशिवाय परमबीर सिंग यांनी त्यांच्या आरोपात संभाषणदेखील जोडलं आहे. त्यामुळे या सगळ्या आरोपांचं गांभीर्य वाढतं.


