महावितरणच्या अधिकार्‍याला खुर्चीत दोरीने बांधले : भाजपा आमदार मंगेश चव्हाणांना अटक


जळगाव : जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकर्‍यांच्या शेतातील वीज जोडण्या तोडण्यात आल्याने आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह संतप्त शेतकर्‍यांनी जळगाव येथील महावितरणच्या अधीक्षक कार्यालयावर धडक देत अधीक्षक अभियंता फारूख शेख यांना खुर्चीला दोरीने बांधून आंदोलन केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भा.ज.पा.आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकर्‍यांना एम.आय.डी.सी. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकर्‍यांच्या विजेच्या समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून शुक्रवारी वीज वितरणच्या जळगाव एम.आय.डी.सी.तील मुख्य कार्यालयात धडक दिली.

सहा हजार वीज जोडणी तोडल्याचा विचारणा जवाब
आमदार मंगेश चव्हाण यांनी अधिकार्‍यांना जाब विचारला. यावेळी अनेक शेतकर्‍यांनी आपल्या समस्या यावेळी मांडल्या मात्र अधिकार्‍यांनी वरीष्ठांच्या आदेशानुसार आपण कारवाई करत असल्याचे उत्तर दिले. त्यामुळे शेतकरी अधिक संतप्त झाले. चाळीसगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसांत तब्बल सात हजार वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत. याबाबत जाब विचारला असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदारांसह संतप्त शेतकर्‍यांनी अधीक्षक अभियंता शेख यांना दोरीने खुर्चीला बांधले व त्याच अवस्थेत केबिनमधून मुख्य कार्यालयाच्या आवारात आणले. वेळीच एम.आय.डी.सी. पोलिसांनी हस्तक्षेप करत अधीक्षक अभियंता शेख यांची सुटका केली. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलिसांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह आंदोलक शेतकर्‍यांना अटक केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !