पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची कोरोनावर मात
यशस्वीपणे उपचार घेतल्यानंतर रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज !
मुंबई : राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे. कोरोनाच्या आपत्तीत पहिल्या दिवसापासून थेट मैदानात उतरून काम करणारे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी स्वत: याबाबत ट्विट करून माहिती दिली होती. यानंतर ते मुंबई येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते.
गुलाबराव पाटील यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू असतांनाही ते मोबाईलच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रशासनाच्या संपर्कात होते. उपचार सुरू असतांनाच त्यांनी धरणगावकरांच्या पाणी टंचाईचे निराकरण करण्यासाठी अंजनी धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले होते. रूग्णालयात असतांनाही पाटील हे जिल्ह्यातील कोरोनाच्या परीस्थितीवर नजर ठेवून होते तर मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्हा नियोजन तसेच विविध खात्यांमधून कामांची मंजुरी मिळवणे आवश्यक असल्याने पालकमंत्र्यांनी या कामाचाही हॉस्पीटलमधूनच आढावा घेत, कामांचे नियोजन केले होते.
