महावितरण अधिकार्यांना मारहाणीचा तीव्र निषेध
10 दिवसात तपास करून 90 दिवसात कोर्टाने निकाल देण्याची मागणी
जळगाव : 26 मार्च रोजी जळगाव महावितरण चे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुक शेख यांना चाळीसगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या साथीदारांनी मारहाण, शिवीगाळ व दोरीने बांधून गैर वर्तन केल्याच्या निषेधार्त शनिवारी अल्पसंख्याक समाजातील सामाजीक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन निषेध व्यक्त करीत कठोर व तातडीने कारवाईसाठी वेळ मर्यादेची मागणी केली. या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यपाल भगतसिंग कोशायरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, ऊर्जा मंत्री नितीन राऊत,पोलिस अधिक्षक जळगाव व राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी संघटना मुंबई ला सुद्धा मेल द्वारे करण्यात आले आहे.
अल्पसंख्यांक समाजाच्या प्रमुख मागण्या अशा
या घटनेचा तपास दहा दिवसात पूर्ण करण्यात यावा, 11 व्या दिवशी कोर्टात चार्जशीट दाखल करावे व सदर प्रकरण विशेष न्यायालयात चालून 90 दिवसांच्या आत या प्रकरणाचा अंतिम निकाल लावण्यात यावा जेणेकरून भविष्यात लोकप्रतिनिधी अथवा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती अशाप्रकारचे गैर कृत्य करणार नाही यासाठी तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमाने करण्यात आली आहे.

शिष्ट मंडळात यांचा होता समावेश
जिल्हा अधिकारी कार्यायात अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी संघाचे जळगाव चे अध्यक्ष माजी उपायुक्त (जीएसटी) एन.ए.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली मणियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, अल्पसंख्यांक सेवा संघाचे अध्यक्ष सलीम इनामदार, हुसेनी सेनाचे जिल्हाध्यक्ष फिरोज शेख, सालार नगरचे सैयद दानीश, शिकलगर बिरादरीचे अनवर खान, शरीफ शाह, बापू फाऊंडेशनचे अध्यक्ष आसीफ शाह, तांबापूर संघटनेचे नदीम शेख नबी व एजाज अहेमद शेख यांची उपस्थिती होती. निवेदनावर अक्सा बॉईज फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड.आमीर शेख, शिवसेनेचे महानगर अध्यक्ष झाकीर पठाण, एमपीजेचे अध्यक्ष आरीफ देशमुख, मार्क्सवादी पक्षाचे अकिल पठाण व अपनी गल्लीचे अध्यक्ष अताअल्लाह खान यांच्या स्वाक्षर्या आहेत.
