हिंगणे येथे पाच एमव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र मंजूर
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
बोदवड : तालुक्यातील हिंगणे येथील 10 ते 12 गावांची विजेची समस्या सोडविण्यासाठी या ठिकाणी कृषी आकस्मिक निधी अंतर्गत पाच एमव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत व जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या पाठपुराव्याला यश आले असून हिंगणे, ता.बोदवड येथे अंदाजीत पाच कोटी रु खर्चाची तरतूद असलेले वीज उपकेंद्र मंजूर झाले आहे. लवकरच उपकेंद्राच्या कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे परीसरातील 10 ते 12 गावातील गावठाण व शेतीक्षेत्राची तसेच आमदगाव शिवारातील धरणावरील विजेची समस्या कायमची सुटणार आहे, अशी माहिती आमदारांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी , प्रशांत पाटील यांनी दिली.
शेतकर्यांची गैरसोय होणार दूर
बोदवड तालुक्यातील हिंगणा, नांदगाव, नाडगाव, शिरसाळा, चिचखेडासीम तसेच आमदगाव शिवारातील धरण व इतर 5 ते 7 गावांच्या गावठाण आणि कृषी पंपाची समस्या कायमची मिटणार असून यामुळे परिसरातील गावकर्यांनी शेतकर्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.


