खाजगी रुग्णालयातही कोरोना रुग्णांचे मोफत उपचार व्हावेत


शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भुसावळ : कोरोना रुग्णांची सातत्याने राज्यात संख्या वाढत असून खाजगी व शासकीय रुग्णालयांमुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खाजगी रुग्णालयातील उपचार गरीब रुग्णांना परवडेनासे झाल्याने गरीब रुग्णांसाठी खाजगी रुग्णालयातही कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

पैशांअभावी गमवावा लागतोय जीव
कोरोनाची लागण झाल्यानंतर पैशांची ओढाताण करून रुग्णांचे नातेवाईक रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी धडपडत आहेत. कोविड रुग्णांच्या उपचारासाठी सिटी स्कॅन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, महागडे इंजेक्शन वगैरेसाठी हजारो पासून लाखो रुपयांपर्यत खर्च करावा लागत आहे. घर खर्च करावा की आपल्या कोविड रुग्णाचे प्राण वाचवावे? असा संभ्रम व चिंता अनेकांसमोर निर्माण झाला आहे. बर्‍याच शासकीय कोविड रुग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आवश्यक लस उपलब्ध नसणे, बेड उपलब्ध नसणे आदी असुविधा असल्याने खाजगी कोविड रुग्णालयात जाण्याशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे पैशांअभावी रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरगरीबांसाठी देखील मोफत उपचाराचा निर्णय तत्काळ घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !