भुसावळात मुरूमासह कच टाकण्यासाठी निधीची उधळपट्टी
दिनेश उपाध्याय यांची मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार
भुसावळ : भुसावळ शहरात वैशिष्टपूर्ण रस्ते विकास योजनेंतर्गत रस्त्यांची कामे सुरू असून ही कामे कंत्राटदार विनय सोनू बढे यांना देण्यात आली आहेत. संबंधित निम्मे रस्ते अद्यापर्यंत विहित कालावधीत पूर्ण केले नसताना व दर्जेदार कामे झाली नसतानाही आत पालिकेने शहरातील रस्त्यावरील पडलेले गड्डे बुजून पॅच वर्क करण्यासाठी जाहीर निविदा काढल्याने हा प्रकार म्हणजे पैशांची उधळपट्टी असल्याचा आरोप दिनेश उपाध्याय यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल
डांबरी रस्त्यावर काही खड्डे पडले वा रस्ता नादुरुस्त झाल्यास पाच वर्षांपर्यंत त्याची दुरुस्तीची जवाबदारी त्या कंत्राटदाराची आहे मात्र 4 जून रोजी पालिकेने मुरूम व कचचा पुरवठा करण्यासाठी निविदा काढली आहे. डांबरीकरण किंवा सिमेंटच्या रस्त्यात कचचा व मुरूमाचा वापर केल्यास रस्त्यांचा दर्जा खराब होईल, असे तक्रारीत नमूद आहे. पालिकेने ही निविदा तातडीने रद्द करावी व नगरपालिकेने ज्या कंत्राटदाराला रस्ते करण्यासाठी काम दिले आहेत त्याच्याकडून सदर काम करून घ्यावेत व नगरपालिका प्रशासनाच्या फायदा करावा, अशी अपेक्षा तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे. अन्यथा न्यायालयात दाद मागू, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने तक्रारीची दखल घेत नगरविकास विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे उपाध्याय कळवतात. दरम्यान, जेथे डांबरीकरण वा काँक्रिटीकरण करण्यात आलेले नाही तेथे मुरूम व कचचा पॅच मारण्यात येार असून जेथे-जेथे आवश्यकता तेथेच मुरूम टाकण्यात येईल, असे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार म्हणाले.


