वरणगावात पाण्यासाठी महिला संतप्त : नगरपरीषदेवर मोर्चा
वरणगाव : नगरपरीषदेवर महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रणिता पाटील-चौधरी यांच्या नेतृत्वात असंख्य महिलांचा धडक मोर्चा आणण्यात आला. शहराला 12 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने महिलांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहे. तसेच नगरपरिषद अस्तिवात आल्यानंतर नागरिकांना 24 तास पाणी देणे बंधनकारक आहे. माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भाजपा सरकारच्या काळात 25 बाय 7 अशी पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. मात्र, महाविकास आघाडी सरकारने त्यावर स्थगिती दिल्याने व टेंडर रद्द केल्याने पिण्याच्या पाण्याची योजना सुरू होत नसल्याने हा प्रश्न बिकट होत आहे. मंजूर पाणी योजनेचे काम जलद गतीने सुरू करा, या मागणीसाठी महिला आघाडीने बुधवारी, 9 जून रोजी नगर परीषदेवर धडक मोर्चा आणला.
यांची होती उपस्थिती
यावेळी मुख्याधिकारी समीर शेख, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, पुरवठा अभियंता गणेश चाटे, प्रशासन अधिकारी पंकज सूर्यवंशी, शहराध्यक्ष भाजपा सुनील माळी, जिल्हा उपाध्यक्ष अॅड.ए.जी.जंजाळे, भाजयुमो अध्यक्ष संदीप भोई, कामगार नेते मिलिंद मेढे, सरचिटणीस गोलू राणे, कृष्णा माळी, संदीप माळी, शशीभाऊ चौधरी, डॉ.प्रवीण चंदने, डॉ.सादिक डी.के.खाटीक, हितेश चौधरी, भाजयुमो सरचिटणीस आकाश निमकर, पप्पू ठाकरे, गजानन वंजारी, योगेश माळी, हिप्पी सेठ यांच्यासह संगीता माळी, नीता तायडे शंकर पवार उपस्थित होते.

पाणीपुरवठा योजनेचे काम करा
यावेळी ‘पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’, ‘हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देण्यात आल्या. शहराध्यक्ष प्रणिता पाटील चौधरी यांनी वरणगाव करांना नवीन योजनेचे पाणी येण्यापूर्वी पाणी नियमित मिळाले पाहिजे, मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम जलद गतीने सुरू करा अन्यथा 18 जून रोजी महिलांचे आमरण उपोषण नगरपरिषद समोर करण्यात येणार आहे. यादरम्यान कमी जास्त झाल्यास नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा महिला आघाडीच्यावतीने दिला आहे.
अखेर मुख्याधिकारी परतले
मुख्याधिकारी भुसावळला बैठकला गेल्याने ते वरणगावला आल्याशिवाय महिला नगरपरिषदमधून जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने वातावरण तापले होते. अखेर मुख्याधिकार्यांना बैठक सोडून वरणगावला 15 मिनिटात यावे लागले. मुख्याधिकारी समीर शेख यांनी 6 दिवसांनी पाणी येईल ते करतो. तसेच मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम जलद गतीने लवकरच सुरू करण्याबाबत ठेकेदाराला नोटीस काढतो. मंजूर योजनेचे काम जलद गतीने सुरू करतो, असे मुख्याधिकारी समीर शेख यांनी मोर्चेकरांना
सांगितले.
