भुसावळात सिनेस्टाईल तरुणीचे अपहरण

स्टेट बँकेसमोरील घटना : दोघांविरुद्ध गुन्हा
भुसावळ : आजी सोबत स्टेट बँकेत पेन्शन घेण्यासाठी आलेल्या 22 वर्षीय तरुणीला चारचाकीतून आलेल्या दोघा आरोपींनी वाहनात ओढत सिनेस्टाईल अपहरण केल्याची घटना शहरात गुरूवारी दुपारी घडली. या प्रकरणी मुलीच्या आजीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास साकेगाव येथील पूजा पाटील (22) ही तरुणी आपल्या आजीसोबत स्टेट बँकेत आजीची पेन्शन घेण्यासाठी आली होती. काही वेळाने दोघेही बाहेर पडल्यानंतर संशयीत आरोपी अभिषेक राजेश शर्मा (रा.चमेली नगर) व मयुर महाजन (रा.श्रीराम नगर, भुसावळ) या युवकांनी सिल्व्हर रंगाच्या गाडीत तरुणीला ओढून बसवत पळवून नेले तर तरुणीने आरडा-ओरड करून मदत मागितली मात्र काही कळण्याआत आरोपी पसार झाले. या घटनेनंतर तरुणीची आजी इंदुबाई पाटील (रा.साकेगाव) यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मिलिंद कंक करीत आहे. शहरातील वर्दळीच्या भागातून तरुणीचे थेट सिनेस्टाईल अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, निरीक्षक दिलीप भागवत म्हणाले की, घटनास्थळाची आपण फुटेज तपासले मात्र त्यात असे काहीही आढळलेले नाही. संपूर्ण प्रकरणाचा बारकाईने तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.

