अॅड.रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरातून भाजपाची उमेदवारी

माजी मंत्री खडसेंच्या भूमिकेकडे लागले आता राज्याचे लक्ष
मुक्ताईनगर : भाजपाने तिकीट कापल्याने नाराज असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे शुक्रवारी सकाळी 11 वाजता आपली भूमिका जाहीर करण्यापूर्वीच खडसे यांच्या कन्या अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांना भाजपाने मुक्ताईनगरातून उमेदवारी जाहीर केली आहे. शुक्रवारी सकाळी भाजपाचे चौथ्या यादीत सात उमेदवार जाहीर केले. दरम्यान, खडसे आता कन्येला भाजपाने उमेदवारी दिल्याने नेमका काय निर्णय घेतात ? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपाने खडसेंसह अनेक दिग्गजांची उमेदवारी कापल्याने नेत्यांचे समर्थक भाजपा पक्षश्रेष्ठींवर कमालीचे नाराज आहेत.
माजी मंत्री खडसेंना दिलासा नाहीच
सलग सहा टर्मपासून आमदार असलेल्या खडसेंना यंदा उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपाने घेतल्याने खडसे समर्थक कमालीचे दुखावले आहेत. एकीकडे हरीभाऊ बागडेंना उमेदवारी दिली जाते मात्र खडसेंना का नाही ? असा प्रश्न खडसे समर्थकांना पडला आहे. खडसेंनी देखील चर्चेच्या वाटाघाटीनंतर पक्षादेश मान्य म्हणत पक्षविरोधी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र शुक्रवारी सकाळी 11 वाजता त्यांनी कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन केले आहे त्यामुळे खडसे कन्येसाठी भाजपाची उमेदवारी स्वीकारणार की आणखी काही दुसरा निर्णय घेणार ? हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे