ममुराबादमध्ये वीज तारेच्या धक्क्याने बैलासह गायीचा मृत्यू

ममुराबाद : उच्च क्षमतेची वीज वाहक तार तुटून धक्का लागल्याने बैलासह गायीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. ऐन हंगामात शेतकर्याचे मोठे नुकसान झाले असून भरपाईची मागणी त्यांनी केलीआहे. पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर शांताराम रामदास पाटील यांनी गायीसह बैलजोडी घरासमोर बांधली असताना जीर्ण वीजवाहक तारांपैकी एक तार अचानक तुटून खाली पडल्यानंतर तिचा गायीसह बैलाला धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. सुदैवाने राजेंद्र भागवत पाटील व अन्य ग्रामस्थ बचावले.
अभियंत्यांना घेराव
शुक्रवारी सकाळी महावितरण कंपनीचे अभियंता सपके व भंगाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. याप्रसंगी माजी सरपंच रावसाहेब पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी दोन्ही अभियंत्याना घेराव घातला. पंचनामा करुन शेतकरी शांताराम पाटील यांना तातडीने भरपाई देण्याची व्यवस्था करावी तसेच जीर्ण वीज वाहक तारा बदलण्यात याव्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, जीर्ण तार तुटून पडल्यानंतर विदगाव येथून खंडीत करण्यात आलेला ममुराबाद येथील वीजपुरवठा तब्बल 12 तासानंतर सुरळीत झाल्याने वीज कंपनीचा भोंगळ कारभारही उघड झाला.