नांद्रा गावात छत कोसळून आजीसोबतच नातवाचा मृत्यू

पाचोरा : तालुक्यातील नांद्रा येथे घराच घराचे छत कोसळून 50 वर्षीय आजीसह सव्वा महिने वयाच्या नातवाचा झोपेतच करुण अंत झाल्याची शुक्रवार, 4 रोजी रात्री 11 वाजता घडली. अन्य तिघे या दुर्दैवी घटनेतून बचावले आहेत. शोभाबाई नामदेव पाटील (50) व त्यांचा नातू समर्थ संदीप पाटील (वय सव्वा वर्षे, रा.लोण, ता.एरंडोल) अशी मृतांची नावे आहेत.
झोपेतच गाठले मृत्यूने
नांद्रा येथील नवेगाव वस्तीतील रहिवासी शोभाबाई नामदेव पाटील हे भाड्याच्या घरात राहतात. 4 रोजी रात्री 11 वाजता कुटूंब गाढ झोपेत असताना अचानक घराचे माती धाब्याचे छत कोसळून आजीसह नातवाचा करुण अंत झाला. कुटुंबातील इतर सदस्य एक मुलगा व दोन मुली यांना वाचवण्यात यश आले. काही महिन्यांपूर्वी शोभाबाई यांचे पती नामदेव पाटील यांचे हृदयविकाराने निधन झाले होते तर या दाम्पत्याची कन्या प्रियंका संदीप पाटील माहेरी बाळंतपणाला आल्यानंतर सव्वा महिन्यापूर्वीच तिचे प्रसुती होवून तिने गोंडस बाळाला जन्म दिला. ‘समर्थ’ असे त्याचे नामकरण करण्यात आले हाते. कुटुंब बाळ झाल्याच्या आनंदात असतानाच नियतीने घाला घातला व सव्वा महिन्याच्या या बाळाचा मातेच्या कुशीतच मृत्यू झाला. मृत शोभाबाई पाटील यांच्या दोन मुलींचे लग्न झाले आहे तर मुलगा हेमंत व मुलगी मानसी हे शिक्षण घेतात. ही भावंडे पोरकी झाली आहेत.