रावेरात अनिल चौधरींच्या उमेदवारी अर्जावर हरकत : पाच तासांच्या घमासनानंतर हरकत निकाली

रावेर : रावेर विधानसभेतील अपक्ष उमेदवार अनिल छबीलदास चौधरी यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेस उमेदवार शिरीष चौधरी, एमआयएम उमेदवार विवेक ठाकरे यांनी आक्षेप घेत लेखी हरकत नोंदवली. शनिवारी झालेल्या छाननीप्रसंगी दोन्ही उमेदवारांकडून सुमारे पाच तास युक्तीवाद झाला. या आक्षेपामध्ये अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्या नामांकन पत्राची निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पडताळणी करून केलेला आक्षेप निकाली काढला.
हरकत निघाली निकाली -अनिल चौधरी
रावेर-यावल मतदारसंघात मतदारांकडून आपणास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने आपल्या उमेदवारीबद्दल हरकत घेण्यात आली मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व बाबींची पडताळणी करीत हरकत निकाली काढल्याचे अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी सांगितले.

14 नामांकन वैध
रावेर मतदारसंघासाठी शनिवारी झालेल्या छाननीत दोन अर्ज अवैध ठरवण्यात आले असून एकूण 14 नामांकन वैध ठरले आहे. माघारीनंतर मतदारसंघातील चित्र आता स्पष्ट होणार आहे.
उच्च न्यायालयात जाणार -विवेक ठाकरे
चौधरी यांच्या संदर्भात आपण सोमवारी उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार असल्याचे विवेक ठाकरे यांनी कळवले आहे.
