भुसावळातील स्पर्धा संजय सावकारेंशी जगन सोनवणेंचे डिपॉजिट जप्त होणार


माजी आमदार संतोष चौधरींचा दावा : विश्‍वासात न घेता उमेदवार दिल्याने अपक्ष उमेदवाराच्या माध्यमातून परीवर्तन : माजी मंत्री एकनाथराव खडसेंशी हाडवैर मात्र विधानसभेतील आवाज दडपण्यासाठी महाअन्याय

भुसावळ- माजी मंत्री एकनाथराव खडसे हे आमचे विरोधक असलेतरी भाजपाने त्यांचे तिकीट कापून ज्येष्ठ नेत्यावर महाअन्याय केला असून विधानसभेतील त्यांचा आवाज दडपण्यासाठी त्यांचे तिकीट कापण्यात आल्याचा दावा, माजी आमदार संतोष चौधरी यांनी करीत कुणाचेही नाव न घेता आम्ही खडसेंचे कार्यकर्ते राहिलो असतो तर तिकीटही नाकारले असते, असे सांगत भुसावळसह रावेरात राष्ट्रवादी जागा मागूनही उमेदवार सूचवल्यानंतरही पक्षश्रेष्ठींनी चुकीचा उमेदवार दिल्याने अपक्ष उमेदवार उभा करून ‘परीवर्तन’ घडवणार असल्याचा आशावाद त्यांनी येथे व्यक्त केला. सियाराम कॉम्प्लेक्समधील कार्यालयात त्यांनी शनिवारी सायंकाळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. पक्षातील प्रमुख पदाधिकार्‍यांशी निर्णय घेवून आपण रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता एका अपक्ष उमेदवाराचे नाव जाहीर करू, असे सांगत त्यांनी आमची स्पर्धा आमदार सावकारे यांच्याशी आहे मात्र जगन सोनवणे यांचे डिपॉजिट जप्त करू शिवाय त्यांच्या परतीचे मार्ग बंद झाले असून त्यांच्या पत्नीने को-ऑप नगसेवक पदाचा राजीनामाही द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

या पदाधिकार्‍यांची उपस्थिती
माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, अपक्ष उमेदवार सतीश घुले, शहराध्यक्ष नितीन धांडे, गटनेता उल्हास पगारे, माजी नगरसेवक आशिक खान, सचिन पाटील आदींसह जनआधारचे नगरसेवक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.









विश्‍वासात न घेता दिला उमेदवार
माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले की, सुप्रीमो शरद पवार यांना विचारूनच सतीश घुले यांना उमेदवार म्हणून पुढे आणले मात्र तिकीट वाटपाच्या गोंधळात कवाडे यांनी आघाडी तोडण्याची भाषा केल्याने चुकीच्या माणसाला तिकीट मिळाले. वास्तविक काँग्रेस पक्ष चिन्हावर निवडणूक लढवून तीन हजार मते मिळवत डिपॉजीट जप्त झालेल्या उमेदवाराव्यतिरिक्त अन्य उमेदवारास तिकिट देणे गरजेचे होते मात्र पक्षाने तिकीट देताना आम्हाला विश्‍वासात घेतले नाही तर रावेरातही अनिल चौधरींना राष्ट्रवादीचे तिकीट मागितले मात्र तेथेही ऐकण्यात न आल्याने अपक्ष उमेदवारांना आम्ही संधी देत आता परीवर्तन घडवू, असेही ते म्हणाले. सर्व पदाधिकारी, नगसेवकांसोबत चर्चा करून अपक्ष उमेदवाराचे काम करण्याच्या निर्णयावर ठाम आहोत. याबाबत सतीश घुले, डॉ.मधू मानवतकर, गीता खाचणे व यमुना रोटे यांच्यापैकी कोणाला मदत करावी, याबाबतचा निर्णय आम्ही रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता तेली समाज मंगल कार्यालयात होणार्‍या मेळाव्यात जाहीर करू, असेही ते म्हणाले.

जनतेला वार्‍यावर सोडणार नाही
विधानसभा निवडणुकीत जनतेला परीवर्तन घडवून आणायचे आहे. शहरातील रस्ते, गटारी, पाणी, स्वच्छता, पथदिवे आदींची स्थिती बिकट आहे. या प्रश्नी जनतेकडून बोलणारे कोणीही नाही मात्र आम्ही अपक्ष उमेदवाराला पूर्ण मदत करून या सर्व समस्या सोडवू. जनतेला कोणत्याही स्थितीत वार्‍यावर सोडणार नाही, असेही चौधरी म्हणाले.

नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा
जगन सोनवणे यांनी आमच्याकडे केवळ तीन नगरसेवक आहेत यासह अनेक आरोप केले आहेत. यामुळे सोनवणेंचा आता आमच्याकडे येण्याचा मार्ग बंद झाला आहे. आमच्याकडे आले तरी आता त्यांना मदत नाहीच शिवाय त्यांचे डिपॉजिट जप्त केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही तसेच ते आमचे स्पर्धकदेखील नाही, आमची प्रमुख लढत भाजपा उमेदवारासोबत असून सोनवणे यांच्या पत्नी पुष्पा सोनवणे यांनी स्विकृत नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा, अशी विनंतीही आपण त्यांना करणार असल्याचे ते म्हणाले.

सरकार स्थापण्यात अपक्षांचा वाटा
भुसावळ व रावेर मतदारसंघातून प्रचंड मतांनी विजयी झालेल्या उमेदवारांचा राज्यातील सरकार स्थापनेत महत्वाचा वाटा असेल व या दोन्ही अपक्षांचा जागा इतिहास घडवतील, असा विश्वासही माजी आमदार संतोष चौधरींनी व्यक्त केला. भाजपला आव्हान देताना तगडा उमेदवार अपेक्षीत होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला विश्वासात न घेता जगन सोनवणे या दुबळ्या उमेदवारास उमेदवारी दिली. गेल्या निवडणूकीत काँग्रेसचा मुख्यमंत्री व सत्ता असतानाही सोनवणे यांना पंजा चिन्हावर केवळ तीन हजार मते मिळवली व डिपॉजीट जप्त झाले. यंदाही सावकारेंचा विजय सोपा करण्यासाठी दुबळा उमेदवार देण्यात आल्याचा आरोप करीत ते म्हणाले की, अपक्षाला ताकद देवून विजयापर्यंत निश्‍चित पोहोचवू, असा आशावादही व्यक्त केला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !