भुसावळ पालिका निवडणुकीत बाहेरच्यांचा हस्तक्षेप सहन करणार नाही


माजी आमदार संतोष चौधरींचा सूचक इशारा : कृउबात विकासकामांचे उद्घाटन

भुसावळ : भुसावळ पालिका निवडणुकीसाठी आता अवघे दोन-तीन महिने राहिले आहेत. सध्या पक्षात काही जण आम्ही उमेदवारी देवू अशा वल्गना करीत आहेत मात्र त्यास आपण जुमानत नाही. या निवडणुकीत बाहेरच्यांचा हस्तक्षेप सहन करणार नाही, असा सूचक इशारा माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे नेते संतोष चौधरी यांनी कुणाचेही नाव न घेता दिला. भुसावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी विकासकामांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर अजाज गफ्फार मलिक, सभापती सचिन चौधरी, राष्ट्रवादीचे भुसावळ शहराध्यक्ष नितीन धांडे, पंढरीनाथ पाटील, वरणगावचे राजेंद्र चौधरी, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, हाजी इकबाल बागवान, सुधाकर जावळे आदी उपस्थित होते.




जलस्त्रोत नसताना अमृत योजनेचे काम
माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले की, शहराची स्थिती बिकट झाली आहे. अमृत योजनेचा जलस्त्रोत निश्चित नसताना पाईप लाईनसाठी खोदकाम करण्यात आले. यावल रोड दोन-तीन वेळा खोदला गेला. यामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. शहरातून तापी नदी वाहतानाही 15 दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. ही बिकट स्थिती आम्ही आगामी काळात बदलून दाखवू. शहरात काही जण घरी बसून रीकामे उद्योग करीत आहे. आगामी निवडणुकीत पक्षाची उमेदवारी देवू, अशा वल्गना केल्या जात आहेत मात्र आता बाहेरच्यांचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही. पक्षात जनतेची कामे करणार्‍यांनाच उमेदवारी मिळेल. केवळ मला पहा आणि फुले वहा अशा लोकांना उमेदवारी देणार नाही. जनतेची कामे होणे अपेक्षीत आहे. सध्या शहरातील विकासकामांमध्ये 70 टक्के नफा व 30 टक्के कामे असे धोरण राबवले जात आहे. यामुळे कामांना गुणवत्ता नाही, अशी टिकाही त्यांनी केली. बाजार समितीमध्ये एक रुपयाचे कर्ज न घेता 68 दुकानांची उभारणी झाली. फ्रुट मार्केट, लिंबू मार्केट उभे राहिले आहे ही आनंदाची बाब असून कृउबा सभापती सचिन चौधरी व सर्व संचालकांनी घेतलेल्या परीश्रमातून ही किमया साकारली आहे. या वास्तूंचा शेतकर्‍यांना अधिकाधिक फायदा व्हावा, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष दीपक मराठे, अनिल पाटील, सलीम पिंजारी, अशोक पंडीत पाटील, सचिव नितीन पाटील आदी उपस्थित होते.

धान्य मार्केट महामार्गावर जाणार
बाजार समितीमध्ये असलेले धान्य मार्केट आगामी काळात शिवपूर-कन्हाळे रोड भागातील 25 एकर जागेवर सुरू होणार आहे. या जागेचे आरक्षण यापूर्वी झाले असून निधी उपलब्ध करून या जागेसाठी तो खर्च करून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल. यामुळे सर्व शेतकर्‍यांना सोयी-सुविधा युक्त धान्य मार्केट उभे राहिल, असा आशावादही माजी आमदार संतोष चौधरी यांनी व्यक्त केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !