जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाला धक्का : खासदार रक्षा खडसेंसह तिघांचे अर्ज बाद
जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी चुरस वाढली असतानाच भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे, विधान परीषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचादेखील उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा देखील उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.
नणंद-भावजयी यांच्यातील सामना टळला
अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील हे बिनविरोध निवडून येतील. मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे हे बिनविरोध निवडून येणार आहेत. दरम्यान, भाजपा खासदार रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या त्रृटींमुळे बाद झाल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. खासदार रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज निवडणुकीपूर्वीच बाद झाल्यानं भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर रोहिणी खडसेंविरूद्ध खासदार रक्षा खडसे यांच्यातील लढत होण्याची शक्यता मावळली आहे. एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर स्मिता वाघ यांनी अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून अर्ज भरला होता.

ठोस निर्णयाअभावी निवडणूक
जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल निश्चित करण्यात आले होते मात्र काँग्रेस पक्षाने भाजपासोबत जाण्यास नकार दिला तर राष्ट्रवादीनेदेखील भाजपसोबत पॅनल करण्यास नकार दिला. बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याची भूमिका मांडली.
