जळगावात सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयावर दरोडा : दोघे आरोपी जाळ्यात
जळगाव : शहरातील विसनजी नगरातील जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयावर दरोडा टाकून चोरट्यांनी तिजोरी लांबवली होती. या प्रकरणी ठाणे शहरासह वर्ध्यातून जिल्हा पेठ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. यात वर्धा येथून ताब्यात घेतलेल्या आरोपीची न्यायालीन कोठडीत रवानगी करण्यात आली तर ठाणे येथून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस शनिवारी जळगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शिवासिंग विरसिंग दुधाणी (28, रा. साईकृपा नगर, आंबेवली, कल्याण जि. ठाणे) यास ठाण्यातून आणि विर मंगलसिंग उर्फ डॉनसिंग मायासिंग दुधाणी (45, रा.नांदेड) याला वर्धा येथून अटक केली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीणकुमार मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहा.पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पेठ पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, समाधान पाटील, विकास पहुरकर, सलीम तडवी यांच्या पथकाने पहिल्या आरोपीला ठाणे येथून ताब्यात घेतले आहे. त्याला गुप्त माहिती वरुन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्यासोबत या दरोड्यात सहभागी असलेले आणखी आरोपी आहेत त्यांचा तपास पोलीस करीत आहेत.

एका आरोपीची कोठडीत रवानगी
वर्धा येथून आरोपी वीर मंगलसिंग दुधाणी याला न्यायालयात हजर केले असता याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आरोपींच्या चार जणांच्या टोळीने या संस्थेच्या कार्यालयात झोपलेल्या फिर्यादीला धमकावून संस्थेची तिजोरी उचलून नेली होती त्या तिजोरीत त्यादिवशी अडीच लाख रुपये असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले होते तेव्हापासून पोलीस या टोळीच्या मागावर होते. तिजोरीसह दोन लाख 66 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा गुन्हा जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
