बस चालकाच्या हातातून भामट्यांनी मोबाईल लांबवला : जळगावातील घटना
जळगाव : शहरातील बीएसएनएल कार्यालयासमोर असलेल्या चांडक हॉस्पीटलसमोरून एकाच्या हातातील सहा हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष तुकाराम धाडी (48, रा.लोणवाडी, ता.जि.जळगाव) हे बस चालक आहेत. लोणवाडी येथे ते आपल्या कुटुंबियांसह राहतात. शनिवार, 23 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास ते चांडक हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या कन्स्ट्रक्शन समोरून पायी जात असतांना त्यांच्या मागून दुचाकीने अज्ञात तीन भामटे आले, त्यांच्या हातातील सहा हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरीने हिसकावून त्यांनी पळ काढला. तिघांनी तोंडाला मास्क लावलेला होता. याप्रकरणी संतोष धाडी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार फिरोज तडवी करीत आहेत.
