नशिराबादजवळ अपघात : जखमी विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू


जळगाव : भुसावळ तालुक्यातील तळवेल येथे माहेरी जावून पुन्हा जळगावला पतीसह घराकडे परतणार्‍या अनघा विनय पाटील (39, रा.भूषण कॉलनी, जळगाव, यांचा मंगळवार, 12 ऑक्टोंबर रोजी नशिराबादजवळ अपघात झाला होता. यात गंभीर जखमी झाल्याने अनघा पाटील यांच्यावर डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयात उपचार सुरू होते. रविवार, 24 रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अपघातास कारणीभूत दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नशिराबादजवळ अज्ञात दुचाकीने दिली होती धडक
अनघा पाटील या पती विनय पाटील व मुलगा कियानसह दुचाकीने भुसावळ तालुक्यातील तळवेल येथे माहेरी गेल्या होत्या. तेथून जळगावकडे परतत असतांना मंगळवार, 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजता नशिराबाद गावाजवळ भरधाव दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील अनघा, त्यांचे पती विनय व कियान हे तीनही जखमी झाले होते. अनघा पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारार्थ डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी विनय पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन धडक देणार्‍या दुचाकीस्वाराविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास गजानन देशमुख करीत आहेत. मयता अनघा यांच्या पश्चात पती विनय, मुलगा कियान (4), मुलगी रुचिता (11), सासु राधाबाई असा परीवार आहे. जिल्हा रुग्णालयात रविवारी शवविच्छेदन करण्यात येवून सकाळी 10 वाजेच्या सुमारास मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !