लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे आजपासून दक्षता जनजागृती सप्ताह
भ्रष्टाचार विरोधी कायद्याची माहिती व अंमलबजावणीची जनजागृती होणार
जळगाव : लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे मंगळवार, 26 ऑक्टोबर ते सोमवार, 1 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार आणि भ्रष्ट पध्दतीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी दक्षता जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने दक्षता जनजागृती सप्ताह अंतर्गत अॅन्टी करप्शन ब्युरोची कार्यप्रणाली, भ्रष्टाचार विरोधी कायद्याची माहिती आणि अंमलबजावणी याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्याअंतर्गत नविन बस स्थानक, स्वातंत्र चौक, सेशन कोर्ट चौक, रेल्वे स्टेशन व इतर गर्दिच्या ठिकाणी दक्षता जनजागृतीपर बॅनर लावण्यात येणार आहेत. तसेच नवीन बस स्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत माहिती असलेले स्टिकर्स लावण्यात येणार असून नागरीकांना हॅन्डबिल्स वाटप करण्यात येणार आहे. गुरुवार, 28 रोजी आकाशवाणी केंद्रावर दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने मुलाखत देण्यात येणार आहे.
पथनाट्यासह चर्चासत्रांचे आयोजन
मुलजी जेठा महाविद्यालय, नुतन मराठा महाविद्यालय जळगांव, व नाहाटा महाविद्यालय, भुसावळ येथील विद्यार्थी/विद्यार्थिनींना भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच जैन उद्योग समुह यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत स्टिकर्स व पोस्टर्स लावण्यात येत आहेत. तसेच शहरातील प्रमुख चौकांमध्ये पथनाट्याचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपणाकडेस कोणत्याही शासकीय अधिकारी /कर्मचारी यांनी शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

