जळगावच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू
जळगाव : औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथे महाविद्यालयाच्या कामासाठी चुलत भावासोबत दुचाकीने निघलेल्या तरूणाचा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला तर चुलत भाऊ जखमी झाला. हा अपघात मंगळवार, 26 रोजी पळासखेडा ते विटनेर दरम्यान सकाळी घडला. साहिल विष्णू आराख (24, रा.खुबचंद साहित्या अपार्टमेंट) असे मयत झालेल्या दुचाकीस्वार तरूणाचे नाव आहे. सोबत असलेला चुलत भाऊ संदेश अशोक आराख (22, रा.समतानगर, जळगाव) हा जखमी झाला आहे.
महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जात असताना अपघात
साहिल आराख हा मंगळवार, 25 ऑक्टोबर रोजी सकाळी समतानगरातील चुलत भाऊ संदेश आराख याच्या सोबत दुचाकी क्रमांक (एम.एच 28-5753) ने सोयगाव येथे महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जात होते. यादरम्यान पळासखेडा मिराचेजवळ शिवढाबा या हॉटेलसमोर दुचाकीस्वार साहिल याचे दुचाकीवरुन नियंत्रण सुटले. यात गाडी पूलाखाली कोसळण्यापूर्वी दुचाकीस्वार साहिल व मागे बसलेला संदेश या दोघांनी दुचाकीवरुन उडी मारली. गाडी पूलाखाली कोसळली तर उडी मारल्यानंतर रस्त्यावरील दगडावर डोके आपटल्याने गंभीर दुखापत होवून साहिल जागीच ठार झाला तर संदेश जखमी झाला आहे. साहिल यास जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांची जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड आक्रोश केला होता. दुपारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

