वाहन हस्तांतरणासाठी लाचेची मागणी : भुसावळातील पंटर विरोधात गुन्हा


जळगाव आरटीओ कार्यालयातील काहींच्या अडचणी वाढण्याची शक्यता

जळगाव : अ‍ॅक्टीव्हा या दुचाकी वाहनाच्या हस्तांतरणासाठी 200 रुपये लाचेची मागणी करणार्‍या उप प्रादेशिक परीवहन कार्यालयातील पंटरच्या विरोधात रामानंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरटीओ कार्यालयातील काही कर्मचार्‍यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.

स्वाक्षरीसाठी मागितली लाच
याबाबत वृत्त असे की, 59 वर्षीय तक्रारदार हे वाहन मालकांकडून ऑथॅरिटी लेटर घेऊन वाहनांच्या हस्तांतरणाचे काम करतात. या अनुषंगाने एका होंडा अ‍ॅक्टीव्हा कंपनीच्या दुचाकीच्या हस्तांतरणासाठी ते आरटीओ कार्यालयात 6 ऑक्टोबर 2021 रोजी आले होते. तेव्हा कार्यालयातील पंटर प्रशांत भोळे उर्फ पप्पू भोळे याने त्यांना स्वाक्षरीसाठी तीनशे रूपये आणि कार्यालयीन खर्च दिल्यानंतरच तुमचे काम होईल असे सांगितले. यामुळे तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे निरीक्षक संदीप साळुंखे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत तक्रार सांगितली. यानंतर 11 ऑक्टोबर रोजी एसीबीच्या अधिकार्‍यांनी तक्रार नोंदवून घेत प्रशांत उर्फ पप्पू भोळे याच्या विरोधात सापळा रचला मात्र त्याला याचा सुगावा लागल्यामुळे त्याने ही रक्कम घेतली नाही. मात्र त्याने तीनशे ऐवजी दोनशे रुपयांची डिमांड करण्यात आली तसेच दोनशे रूपयांमध्ये कोण वाटेकरी असतील ? असे सांगितले. जे व्हाईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड करण्यात आले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी तक्रारदाराने पुन्हा लाच देण्याचा प्रयत्न केला असता संबंधिताने लाच घेतली नाही मात्र या सर्व प्रकरणात लाचेची मागणी करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने रामानंदनगर पोलीस ठाण्यात प्रशांत जगन्नाथ भोळे उर्फ पप्पू भोळे, (रा.जे.के.मोटार ड्रायव्हींग स्कूल, जामनेर रोड, भुसावळ) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !