सहा गावठी कट्ट्यांसह 24 काडतुसे जप्त
नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई : तिघे गजाआड
चोपडा : नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तालुक्यात दोन ठिकाणी छापे मारून सहा गावठी कट्टयांसह 24 जीवंत काडतुसे जप्त केली तर तीन आरोपींना अटक करण्यात आली. नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी.जी. शेखर यांना चोपडा तालुक्यात दोन ठिकाणी अवैध शस्त्रविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तालुक्यातील खार्या पाडाव शिवारातील उमर्टी ते वैजापूर रस्त्यावरील टेकडीजवळ सतनामसिंग महारसिंग जुनैजा (22, रा. उमर्टी, जिल्हा बडवाणी) याच्याकडून 82 हजार 500 रुपये किंमतीचे तीन स्टिलचे गावठी बनावटीचे पिस्टल तसेच मॅगझीनसह 14 जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दुसर्या कारवाईत दोघे गजाआड
दुसर्या छाप्यामध्ये चोपडा ते धरणगाव रोडवरील हॉटेल विश्व समोर 75 हजार रुपये किंमतीचे तीन स्टिलचे गावठी बनावटीचे पिस्टल व दहा जिवंत काडतूस बाळगणार्या अक्षय महाले (25, रा.चोपडा), विजय पाटील (32, रा. चोपडा) यांना पोलिसांनी अटक केली तर हॅप्पी उर्फ प्रवीण शिकलकर (35, रा.उमर्टी, मध्यप्रदेश) हा पसार झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौथ्या फरार आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, एकाच वेळेस सहा गावठी कट्टे आढळून आल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.



