जळगावात सेवा सहकारी संस्थेची तिजोरी लांबवणार्या चोरट्यांना बेड्या
जळगाव : शहरातील विसनजी नगर परीसरातील कृषी औद्योगीक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयावर दरोडा टाकून तिजोरी पळवून नेणार्या उर्वरित दोन संशयितांना जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली. रणजीत सिंग जुन्नी यास जळगाव शहरातून व सागरसिंग बावरी यास जालना येथून अटक करण्यात आली.
तिजोरी न फुटल्याने चक्क पळवली
जळगाव जिल्हा कृषी सहकारी सेवा संस्थेकडे विकास दूध आणि पारले बिस्कीटची एजन्सी आहे. संस्थेत बर्याचदा मोठ्या प्रमाणात रोकड असते. या अनुषंगाने 6 जुलै 2021 रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अनोळखी चार जणांनी संस्थेच्या कार्यालयाचा कडी-कोयंडा ताडून आत प्रवेश करीत कार्यालयात झोपलेल्या कर्मचार्यांना धमकी देऊन चोरीचा प्रयत्न केला. त्यांना तिजोरी न उघडता आल्यामुळे त्यांनी शेवटी तिजोरी घेऊनच पळ काढला. या तिजोरीत अडीच लाख रूपयांची रोकड असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष संजीव मुकुंदराव पाटील यांनी दिली होती. संजीव पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीवरून अटक
तपासाअंती पथकाने संशयीत आरोपी शिवासिंग विरसिंग दुधाणी (28, रा. साईकृपा नगर, आंबेवली, कल्याण, जि.ठाणे) याला ठाण्यातून आणि वीर मंगलसिंग उर्फ डॉनसिंग मायासिंग दुधाणी (45, रा.झरी, ता.परभणी) याला वर्धा येथून दोघांना यापूर्वी 22 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. आरोपींच्या चौकशीत अन्य दोन संशयीतांची नावे आल्यानंतर रणजीत सिंग जुन्नी यास जळगाव शहरातून व सागरसिंग बावरी यास जालना येथून अटक करण्यात आली. जिल्हा पेठ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलीस नाईक सलीम तडवी, पोलीस शिपाई विकास पहुरकर, समाधान पाटील, रवींद्र साबळे, माधव कांबळे, रीहान शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
