मेहुणबारे पोलिसांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा : शालकासह मेहुण्याला अटक


खेडगाव शिवारातील मयत बोरखेडा गावातील रहिवासी : दारूच्या नशेत केलेली मारहाण बेतली जीवावर : आरोपींना चार दिवसांची कोठडी

चाळीसगाव : तालुक्यातील खेडगाव येथील विहिरीत आढळून आलेल्या अज्ञात इसमाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी मेहुणबारे पोलिसांनी दोघा आरोपींना गजाआड केले. या घटनेत सोमनाथ प्रभाकर पाटील (35, बोरखेडा बुद्रुक) यांचा खून झाल्याचे उघड झाले असून या प्रकरणी प्रवीण उर्फ भिकन पाटील (40, रा.बोरखेडा खुर्द) व भटू वसंत सोनवणे (35, कळमडू) या आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

क्षुल्लक वाद बेतला जीवावर
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, 21 सप्टेंबर रोजी दुपारी सोमनाथ पाटील हे मद्य प्राशन करून खेडगाव शिवारातील शेतात आल्यानंतर त्यांचा भिकन पाटील यांच्याशी वाद होवून हाणामारी झाली. भिकन पाटील झालेली अश्लील शिविगाळ व मारहाण जिव्हानरी लागल्याने त्यांनी सोमनाथ पाटील यांना लाथ मारून विहिरीत ढकलल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

पोलिसांच्या तपासानंतर मयताची पटली ओळख
23 सप्टेंबर 2021 रोजी खेडगाव शिवारातील शेतगट नंबर 225/2 मधील दत्तात्रय नारायण कोठावदे यांच्या शेतातील विहीरीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला होता. मेहुणबारे पोलीस ठाण्यात सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनोळखी मयताची ओळख पटविण्याकरीता मेहुणबारे पोलिसांनी मयताचे फोटो वर्तमानपत्रे,सोशल मिडीयावर व्हायरल करीत ओळख पटवण्याचे आवाहन केले. मयत व्यक्ती हा चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा बुद्रुक येथील सोमनाथ प्रभाकर पाटील असल्याचे उघड झाले. बोरखेडा बु.॥ येथील अजबराव प्रभाकर पाटील यांचा भाऊ सोमनाथ प्रभाकर पाटील (35, रा.बोरखेडा बु.॥) हा 21 सप्टेंबर 2021 रोजी बोरखेडा गावातील भिकन पाटील याच्यासोबत मोटारसायकलवर बसून गेला मात्र परत आलेला नाही, अशी माहिती पोलिसांना मिळाली. यावरून भिकन पाटील याला सोमनाथबाबत विचारले असता त्याने त्याच दिवशी न्हावे गावी सोमनाथ पाटील गेला असल्याचे अजबराव यांना सांगितले होते मात्र सोमनाथचा शोध न लागल्यामुळे अजबराव यांनी 2 ऑक्टोबर रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात सोमनाथ पाटील हा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. अजबराव यांना मेहुणबारे पोलिसांनी अकस्मात मृत्युमधील अनोळखी मयताचे फोटो, कपडे, बुट दाखविले असता ते त्यांनी आपला भाऊ सोमनाथ प्रभाकर पाटील याचेच असल्याचे ओळखल्यानंतर तपासाचा एक टप्पा पार पडला होता.

भावाला होता घात-पाताचा संशय
भाऊ सोमनाथ याचा घातपात झाल्याचा संशय अजबराव यांना असल्याने त्यांनी मेहुणबारे स्थानकाचे सहा.पोलीस निरीक्षक पवन देसले यांना तशी माहितीदेखील दिली होती. त्यानुसार पोलिसांनी प्रवीण ऊर्फ भिकन पाटील (रा.बोरखेडा खुर्द) व भटू वसंत सोनवणे (कळमडू) यांच्यासह अन्य संशयीतांकडे वेळोवेळी आलटून-पालटून चौकशी केली होती परंतु
संशयीत हे वेळोवेळी उडवा-उडवीची उत्तरे देत होते. मेहुणबारे पोलिसांनी घटनेच्या दिवसांपासून त्यांच्या हालचालींवर गोपनीयरीत्या सतत पाळत ठेवुन त्यांच्या विषयी तांत्रीक विश्लेषकांची मदत घेवून अभ्यासपुर्ण तपास केला. संशयीताच्या बदलत जाणार्‍या जवाबानंतर संशयीत प्रवीण ऊर्फ भिकन पाटील व भटू वसंत सोनवणे यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी अखेर गुन्हा केल्याची कबंली दिली.

हाणामारी झाल्यानंतर ढकलले विहिरीत
संशयीत प्रवीण उर्फ भिकन पाटील (रा.बोरखेडा खुर्द) व भटू वसंत सोनवणे यांनी पोलिसांना सांगितले की 21 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता भिकन पाटील हा सोमनाथ प्रभाकर पाटील याला त्याच्या मोटारसायकलवर बसवुन खेडगाव येथे आला. त्यानंतर दुपारी सोमनाथ हा दारू पिऊन शेतात आला असता त्याला भिकन पाटील याने तू येथे दारु प्यायला आला आहे की, कामाला आहे ? अशी अपमानास्पद अश्लिल शिवीगाळ केली असता सोमनाथ प्रभाकर पाटील व भिकन पाटील यांच्यात मारामारी झाली. या भांडणात भिकन पाटील याने दारुच्या नशेत असणार्‍या सोमनाथ पाटील याला लाथ मारुन पाण्याने तुडूंब भरलेल्या विहिरीत ढकलुन दिले. यानंतर त्याने घटनास्थळावरून पलायन केले. यानंतर सोमनाथ प्रभाकर पाटील हा सकाळी न्हावे येथे दारु पिण्यासाठी गेला तो परत आला नाही, अशी सोमनाथच्या नातेवाईकांना व गावात खोटी बतावणी केली.

घटनेची वाच्यता न करण्याची दिली धमकी
23 सप्टेंबर रोजी दुपारी सोमनाथ पाटील याचे प्रेत विहिरीत वर फुगून आल्यानंतर भिकन पाटीलचा शालक भटू वसंत सोनवणे याने सदर प्रेताची माहिती भिकन याला फोनद्वारे दिली व यावेळी भिकनने या प्रकरणाची वाच्यता कोणालाही न करण्याबाबत भटूला सांगितली. यामुळे भटू सोनवणे यानेदेखील या घटनेची माहिती पोलिसांना न देता लपवून ठेवुन भिकन पाटील यास गुन्ह्यात मदत केल्याने त्यासही आरोपी करून दोघांविरोधातत खुनाचा गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा गुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक कैलास गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले, उप निरीक्षक हेमंत शिंदे, उप निरीक्षक योगेश ढिकले, प्रकाश चव्हाणके, प्रताप मथुरे, सिध्दांत शिसोदे, हनुमंत वाघेरे , गोरख चकोर, शैलेश माळी यांच्या पथकाने उघडकीस आणला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !