भडगाव तालुका हादरला : जादा भावाची विचारणा केल्याने दुकानदाराच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू


भडगाव : तालुक्यातील पिचर्डे येथे गोडेतेलाचा भाव जास्त लावल्याची विचारणा केल्याचा राग आल्याने दुकानदाराने ग्राहकाला सिमेंट बाकावर आपटल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पंकज विठ्ठल पाटील (23) असे मयताचे नाव आहे. आरोपी दुकानदार हर्षल पाटील यास अटक करण्यात आली असून भडगाव न्यायालयाने त्यास त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

भाव जास्त लावल्याची विचारणा बेतली जीवावर
तालुक्यातील पिचर्डे येथील पंकज विठ्ठल पाटील (23) या तरुणाचेवडील विठ्ठल पाटील हे शुक्रवार, 29 रोजी सायंकाळी पिचर्डे बस स्थानक चौकातील दुकानावर गोडेतेल व किराणा घेण्यासाठी गेले होते. यावेळी दुकानदार हर्षल अशोक पाटील याने तेलाचा जास्त भाव लावला. याचा जाब पंकज पाटील याने दुकानदार हर्षल पाटील याला विचारला. याचा राग येऊन संतापाच्या भरात हर्षल पाटील याने पंकज पाटील याला शिवीगाळ करून दुकानासमोर असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर आपटले. यात पंकज गंभीर जखमी झाल्याने ग्रामस्थांनी त्यास तत्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाला. याबाबत मृताची आई रेखाबाई पाटील यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसात दुकानदार हर्षल पाटील याच्याविरुद्ध कलम 302, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहेत. आरोपी हर्षल पाटील यास अटक करून 30 रोजी भडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !