जळगावातील तरुणीची फसवणूक : खात्यातून दिड लाखांची रोकड लंपास


जळगाव : ओला कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून 23 वर्षीय तरूणीच्या बॅक खात्यातून अज्ञात व्यक्तीने दीड लाख रूपये लांबवले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले
रूची अजय जाखोटे (23, रा.पिंप्राळा, जळगाव) या खाजगी नोकरीला आहेत. शनिवार, 30 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 5 ते 8.30 वाजेच्या दरम्यान त्यांनी एका अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरील व्यक्तीने त्यांचे नाव गाव न सांगता आपण ओला कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे बतावणी करून तुमचे 313 रूपये तुमच्या खात्यात वर्ग करत असल्याचे सांगितले. अनोळखी व्यक्तीने त्यांनी मोबाईलमध्ये अ‍ॅनी डेस्क नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. तरूणीने अ‍ॅप डाऊनलोड केले आणि अज्ञात व्यक्तीने तरूणीच्या मोबाईलवर पुर्ण नियंत्रण मिळविले. अवघ्या काही मिनिटात त्यांच्या बँकेच्या खातून एक लाख 49 हजार 991 रूपये काढून फसवणूक करण्यात आली दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे तरूणीच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी रविवारी सायंकाळी सहा वाजता तरुणीच्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !