नवजात अर्भकाला फेकणार्‍या मातेचा अखेर लागला शोध


अमळनेर : नवजात अर्भकाला (एक दिवसाच्या मुलीला) अमळनेर बसस्थानकातील शौचालयाजवळ निर्दयीपणे कचर्‍यात फेकून दिल्याची घटना 31 ऑक्टोबर रोजी घडली होती. पोलिसांनी सहा तासात अर्भकाला फेकणार्‍या मातेचा शोध लावला आहे.

एक दिवसीय बाळाला फेकून मातेचे पलायन
अमळनेर येथील बसस्थानकावरील शौचालयाजवळ एक दिवसाच्या मुलीला फेकल्याची घटना उघडकीस आल्यानंतर एसटी कर्मचार्‍यांच्या मदतीने नवजात बाळाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जळगाव येथे हलवण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अज्ञात मातेचा शोध सुरू केला. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, एपीआय मच्छींद्र दिवे यांच्या पथकाने गर्भवती महिला कोणकोणत्या दवाखाण्यात तपासणीसाठी आली याची चौकशी केल्यानंतर या महिलेचा छडा लागला.

ग्रामीण रुग्णालयात महिलेवर उपचार
अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शनिवारी अमळनेर तालुक्यातील एका गावातील महिला नातेवाईकांसोबत पोट दुखते म्हणून तपासणीसाठी आली होती. ती गरोदर असल्याने व आधीही तिचे सिझर झाले असल्याने जोखीम नको म्हणून तिला धुळे जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार धुळ्याला तिचे सीझर करून प्रसूती करण्यात आली. धुळ्यात या महिलेला मुलगी झाली. त्यानंतर तिने व तिच्या वडिलांनी धुळे जिल्हा रुग्णालयात डिस्चार्जसाठी गोंधळ घातला होता. काही वेळाने त्यांनी डॉक्टर व कर्मचार्‍यांची नजर चुकवून पळ काढला व अमळनेर बसस्थानकावर आल्यावर मुलीला निर्दयीपणे शौचालयाजवळ फेकून दिल्याची बाब उघड झाली. दरम्यान, महिलेचे सीझर झाले असल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महिलेच्या वडिलांचा मृत्यू
संशयीत महिलेचे वडील अस्वस्थ अवस्थेत पडलेले आढळून आल्याने गावकर्‍यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा हृदय विकाराने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !