जळगावातील सराफा दुकानातील चोरीचा उलगडा : चोरट्याच्या मध्यप्रदेशातून आवळल्या मुसक्या
जळगाव : शहरातील कंजरवाडा परीसरातील संत चोखामेळा वस्तीगृहामागील नंदुरबारकर सराफ दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 40 हजाराचे दागिने चोरून नेले होते. जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार संजय हिवरकर यांना चोरीच्या गुन्ह्यात संशयीत भारतसिंग भाटीया हा असल्याची व तो मध्यप्रदेशातील सतवास येथे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. आरोपी भारतसिंग आयासिंग भाटीया (19) यास अटक केल्यानंतर त्याने अन्य दोन साथीदारांसोबत चोरी केल्याची कबुली दिली आहे.
सापळा रचून केली अटक
मध्यप्रदेशातील सतवास येथे गुन्ह शाखेच्या पथकाने सतवास पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने बुधवारी पहाटे सापळा रचून संशयीत भारतसिंग भाटीया (19, रा. यात्रा मैदान, आत्माराम बाबा पाण्याच्या टाकीजवळ, सतवास, जि. देवास, मध्यप्रदेश) यास अटक केली. भारतसिंग भाटिया याला जळगावात आणल्यानंतर त्याने जळगावातील मोनुसिंग जगदीशसिंग बावरी व अन्य एका साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केल्यानंतर मोनुसिंग बावरी याच्या घरी जाऊन दागिन्यांचे समान हिस्से करून वाटप करून घेतल्याचे व त्याच्या हिस्स्यावर आलेले दागिने सतवास येथे लपवून ठेवल्याची कबुलीही त्याने पोलिसांना दिली आहे. भारतसिंग हा मध्यप्रदेशातील हिस्ट्रीशिटर गुन्हेगार आयासिंग भाटिया याचा मुलगा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील उपनिरीक्षक सुधाकर लहारे, सहा.फौजदार रवी नरवाडे, हवालदार संजय हिवरकर, राजेश मेढे, पोलीस नाईक संतोष मायकल, चालक मुरलीधर बारी आदींनी ही कारवाई केली.
