जळगावात अवैधरीत्या गुटखा विक्री : 91 हजारांचा मुद्देमाल जप्त


जळगाव : जळगावात अवैधरीत्या गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कारवर्इा करीत दोन दुकानांवर छापा टाकून 91 हजार 493 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. जळगाव शहरातील सिंधी कॉलनीतील राजाराम नगर आणि तिजोरी गल्लीत ही कारवाई करण्यात आली. दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या दोघांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील सिंधी कॉलनीतील राजाराम नगर आणि तिजोरी गल्ली भागात अवैधरीत्या आणि विना परवाना गुटखा आणि पान-मसाल्याची साठवणूक होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना मिळाली. त्यानुसार सहा.पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने मंगळवारी रात्री छापा टाकला.

हा मुद्देमाल केला जप्त
या कारवाईत राजाराम नगरातील संतोष हुकमतमल राजपाल यांच्या घरात 67 हजार 595 रूपये किंमतीचे गुटखा आणि पानमसालाचा साठा आढळून आला. संतोष राजपाल याच्या मालकीचे तिजोरी गल्लीतील मिरा ट्रेडर्स नावाच्या दुकानातून 23 हजार 898 रूपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवाईत एकुण 91 हजार 493 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शहर व एमआयडीसी पोलिसात गुन्हा
याप्रकरणी कॉन्स्टेबल तेजस मराठे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात तर पोलीस नाईक दीपक चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात संशयीत आरोपी संतोष हुकमतमल राजपाल आणि एका 17 वर्षीय मुलाविरोधात वेगवेगळा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे आणि कॉन्स्टेबल विजय निकुंभ करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !