रीक्षा व दुचाकी वाहनाची समोरासमोर धडक : दुचाकीस्वार ठार
जामनेर : तालुक्यातील नागन चौकी गावाशेजारी दुचाकी वाहन व रीक्षाची समोरा-समोर धडक झाल्यामुळे दुचाकी चालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली तर ॲपे रीक्षा चालकही जखमी झाल्याची माहिती आहे.
दुचाकी वाहन व रीक्षात समोरासमोर धडक
शुक्रवार, १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सामरोद येथील रीक्षा चालक (एम. एच. १९ एस २५५६) ही मालवाहू रीक्षा रामपूर गावांमध्ये ऊस विकण्यासाठी आला होता. तो परत जात असताना तिकडून रामपूर गावाकडे येणारा दुचाकी वाहनधारक दरबार संगडा चव्हाण (४८, रा. रामपूर) यांच्या दुचाकी वाहन व रिक्षा समोरासमोर धडक झाल्यामुळे दुचाकीचालक दरबार चव्हाण या अपघातात जबर मार लागल्याने मयत झाला तर रीक्षा चालक जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दरबार चव्हाण यांच्या एक मुलगा, मुलगी, पत्नी असा परीवार आहे. या घटनेबाबत जामनेर पोलिसात रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

