पाचोरा शहरातील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार : आरोपीला दहा वर्ष कारावास


जळगाव : पाचोरा शहरातील सात वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी भैय्या भरत गायकवाड (पाचोरा) यास 10 वर्षे सश्रम कारावास आणि 35 हजार रूपयांचा दंड जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस.एन.माने यांनी सुनावला.

2018 मध्ये घडला गुन्हा
पाचोरा शहरातील एका भागात राहणारी सात वर्षीय अल्पवयीन बालिका आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून 7 मार्च 2018 रोजी दुपारी 12. 30 वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी भैय्या भरत गायकवाड (22, रा.पाचोरा) या तरुणाने पीडीत बालिकेला मोबाईलवर गेम खेळायला चल, असे बोलून त्याच्या घरात नेले. त्याठिकाणी अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केला. या प्रकरणी पीडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा खटला जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.एस.एन.माने यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला. यात सरकार पक्षातर्फे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडीत मुलगी, तिची आई, तपासी अंमलदार व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. यात भैय्या भरत गायकवाड याला दोषी ठरवून न्या. माने यांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये 10 वर्ष सश्रम कारावास आणि 35 हजार रुपयांच्या एकत्रीत दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.केतन ढाके यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून हवालदार विजय पाटील यांनी काम पाहिले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !