दुसर्‍याचे बाळ कड्यावर घेवून बारसे करणे ही शिवसेना जिल्हाप्रमुख महाजनांना सवय

माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांचा पलटवार : अग्निशमन बंब माजी मंत्री महाजनांमुळेच मिळाल्याचा केला दावा


वरणगाव : दुसर्‍याचे बाळ कड्यावर घेवून बारसे करणे ही शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांची सवय असून वरणगाव पालिकेला मिळालेला अग्निशमन दलाचा बंब हा माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांनीच मिळाल्याचा दावा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केला आहे. मुक्ताईनगर व बोदवडला एक कोटींचा निधी आमदार महाजन यांनी मंजूर करून दिल्यावर तिथे का पालकमंत्र्यांनी गाडी का दिली नाही? असा सवालही काळे यांनी उपस्थित केला आहे.

विरोधक दुसर्‍यांच्या मुलांचे करताय बारसे : काळे
काळे म्हणाले की, वरणगाव शहरात 15 नोव्हेंबर रोजी आलेली अग्निशमन दलाच्या बंबाची गाडीसाठी 50 लाखांचा निधी हा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी 15 जुलै 2019 रोजी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे व आपण स्वतः जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असताना केलेल्या मागणीनुसार मंजूर केला. अग्निशमन सेवा बळकटीकरण योजनेतून 50 लाख मंजूर करण्यात आले तसेच आपण स्वतः वरणगावचे नगराध्यक्ष म्हणून 5 जून 2020 पर्यंत कार्यरत होतो. त्यापूर्वी म्हणजे 3 मार्च 2020 रोजी गाडीला प्रशासकीय मान्यता देखील मिळाली असल्याची माहिती लेखी पुराव्यासह माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी झालेल्या भाजपा कार्यलयात दिली.

वरणगाव राजकारणाला कंटाळले
काळे म्हणाले की, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन हे नेहमीच खोटी माहिती देउन वरणगावकरांची दिशाभूल करीत असतात. मेहनत आम्ही करायची व बारशाचे कार्यक्रम मात्र विरोधक करीत आहे. भाजपाने 24 तास पाणीपुरवठ्यासाठी 70 कोटींचा निधी हा तत्कालीन भाजपा सरकारनेच दिला होता व यापुढेही वरणगावचा विकास भाजपाच करू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वरणगावकर जाती-पातीच्या भावनिक राजकारणाला कंटाळले असून वरणगावकरांना विकास हवा आहे. भाजपाला अग्निशामक बंबाच्या गाडीचे श्रेय घ्यायचे असते तर 15 तारखेला पालकमंत्र्यांनी रात्री केलेले लोकार्पण आम्ही सकाळीच वरणगावला करून टाकले असते, असेही सुनील काळे म्हणाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या बोदवड व मुक्ताईनगरला अग्निशमक बंबाची गाडी का देवू शकले नाही? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. ही बाब सुद्धा जनतेने लक्षात घेण्यासारखी आहे असेही सुनील काळे यावेळी म्हणाले.

यांची होती उपस्थिती
यावेळी पत्रकार परीषदेला भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, हितेश चौधरी, गोलु राणे, डॉ.प्रवीण चांदणे , मुस्लिम अन्सारी, पप्पू ठाकरे, योगेश माळी, संदीप माळी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !