सांडपाण्याच्या कारणावरून जळगावात वाद : चौघांकडून दाम्पत्यास मारहाण
जळगाव : घराच्या सांडपाण्याच्या कारणावरून जुन्या जोशी कॉलनीत राहणार्या 42 वर्षीय व्यक्तीला चार जणांनी लोखंडी रॉड डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. सोमवार, 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीष दिलीप जोशी (42, रा.जुनी जोशी कॉलनी) हे पत्नी मीनाक्षी यांच्यासह वास्तव्याला आहे. एमआयडीसीत खाजगी कंपनीत नोकरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. सोमवार, 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गिरीष जोशी यांच्या घराचे सांडपाणी हे शेजारी राहणारे उमेश हरी लागवे यांच्या अंगणात आले होते. याचा राग उमेश लागवे याला आल्याने त्याने लोखंडी रॉड घेवून गिरीष जोशी यांच्या डोक्यात हाणला. यात ते गंभीर जखमी झाले तर तुषार हरी लागवे, मीनाबाई हरी लागवे आणि बेबीबाई ओंकार लागवे यांनी गिरीष जोशी यांची पत्नी मीनाक्षी यांना चापटा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. या संदर्भात गिरीष जोशी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री 9 वाजता धाव घेवून चौघांविरोधात तक्रार दिली. जोशी यांच्या तक्रारीवरून उमेश लागवे, तुषार लागवे, मिनाबाई लागवे आणि बेबीबाई लागवे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनील सोनार करीत आहे.





