धूम स्टाईल आलेल्या चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल लांबवला
जळगाव : शहरातील रेणुकानगर येथील तरूणाचा खिश्यातील मोबाईल अज्ञात दोन जणांनी दुचाकीवर येवून हिसकावून लांबविला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
धूम स्टाईल लांबवला मोबाईल
राजेश मुकुंदा गुरव (32, रा.रेणुका नगर, जळगाव) हा तरुण आई व बहिणीसोबत वास्तव्याला आहे. राजेश हा शहरातील गणपती हॉस्पिटल येथे 10 वर्षांपासून वॉर्ड बॉय म्हणून काम करत आहे. सोमवार, 13 डिसेंबर रोजी गणपती हॉस्पिटल येथील काम आटोपून रात्री 10.30 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरून इच्छादेवी चौकातून सायकलीने जात असताना त्याच्या मागून एका पल्सर गाडीवर अज्ञात दोन भामटे आले व त्यांनी राजेश यांच्या खिशात ठेवलेला आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरीने हिसकावून भुसावळकडे पळ काढला. या प्रकरणी राजेश गुरव यांनी मंगळवार, 14 डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात दोन जणांविरोधात तक्रार दिल्यावरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहे.





