बंद घर फोडले : संशयीत जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जळगाव : तालुक्यातील मन्यारखेडा येथील फातेमा नगरातील घरातून रोकडसह दोन मोबाईल लांबविणार्या संशयीत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपीला पुढील कारवाईसाठी नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हमीद खान अय्युब खान (19, रा. गणेशपुरी, मेहरूण, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
मन्यारखेडा येथे झाली होती घरफोडी
इम्रान शरीफ खान (36, रा.फातेमा नगर, मन्यारखेडा, ता.जि.जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. 31 मे 2021 रोजीच्या मध्यरात्री 1 ते 3 वाजेच्या दरम्यान घरातील सर्व सदस्य झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातून रोकड आणि दोन मोबाईल मिळून 22 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला होता. या प्रकरणी इम्रान खान यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.





आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात
या गुन्ह्यातील पाहिजे असलेला संशयीत आरोपी हा जळगावातील काशिनाथ चौकात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहुल पाटील, चा.स.फौ राजेंद्र पवार आदींनी संशयीत आरोपी हमीद खान अय्युब खान (19, रा. गणेशपुरी, मेहरूण जळगाव) याला दुपारी अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
