जळकेत कटलरी दुकान फोडत चोरट्यांचा 30 हजारांच्या मुद्देमालावर डल्ला
जळगाव : तालुक्यातील जळके येथील एकाचे कटलरी दुकान फोडून दुकानातील रोकड व वस्तू मिळून 30 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला तर तर गावातील ग्रामपंचायत कार्यालयात चोरी करण्याचा प्रयत्न मंगळवारी पहाटे उघडकीला आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा
जळगाव तालुक्यातील जळके येथील मारूती मंदीराजवळ अशोक रतन जाधव यांचे कटलरीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे सोमवार, 13 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता दुकान बंद करून जाधव हे घरी गेले. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कलटरीच्या दुकानाचे शटर उचकावून दुकानात ठेवलेली 30 हजार रुपयांची रोकड आणि 700 रुपये किंमतीचे बेन्टेक्सच्या बांगड्या मिळून 30 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे मंगळवार, 14 डिसेंबर रोजी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास उघडकीला आले. त्याचवेळी गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप देखील तोडलेले दिसून आले. यात कार्यालयातील लोखंडी कपाटातील कागदपत्र फेकून दिल्याचे समोर ग्रामपंचायत शिपाई राजु काशिनाथ पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी अशोक जाधव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात दुपारी दोन वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.





