भिक्षुकी करणार्या 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू
जळगाव : शहरात भिक्षुकी करून उदरनिर्वाह करणार्या 18 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने तरुणावर अंत्यविधी करण्यात आला. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगेश संजय ढाकणे (18, रा.बाळापूर, जि.आकोला) असे मयताचे नाव आहे.
भिक्षुकीवर तरुणाचा उदरनिर्वाह
मंगेश हा तरुण गेल्या आठ ते दहा वर्षांपासून जळगाव शहरात एकटाच राहत होता. मंगळवार, 14 डिसेंबर रोजी दुपारी त्याला श्वासोच्छवास घेण्यात त्रास होत होता. अश्यावेळी सामाजिक कार्यकर्ते आयुष मणियार यांनी पुढाकार घेतला. आयुष मनियार आणि त्याच्या सहकार्यांनी त्याला कपडे व जेवण दिले. त्यानंतर त्याला विश्वासात घेवून त्याचे नाव व गाव विचारले. वडील संजय तुकाराम ढाकणे यांचा मोबाईल नंबर दिलेला होता. आयुष माणियार यांनी अत्यवस्थ झालेल्या मंगेशला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. बुधवार, 15 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास मंगेश ढाकणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासंदर्भात माणियार यांनी दिलेल्या मोबाईलवरून संपर्क साधून मयत मुलाच्या वडीलांशी संपर्क साधून माहिती दिली. गुरूवार, 16 डिसेंबर रोजी सकाळी मयत मुलाचे वडील आल्यानंतर मुलाच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक रवींद्र पाटील हे करीत आहे.





