व्याजाच्या पैशांची परतफेड करूनही घरातील सामान बळकावला : यावलमधील तरुणाविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल
यावल : शहरातील श्रीराम नगरातील सुमित युवराज घारू (21) या तरुणाला गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती नंतर या तरुणाविरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच तरुणाविरोधात आता अवैध सावकारीप्रकरणी नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलिसात अवैध सावकारीचा गुन्हा
शहरातील श्रीराम नगरातील रहिवासी सुमित युवराज घारू (Sumit Youraj Gharu) या तरुणाला गावठी पिस्टल बाळगताना रविवार, 2 जानेवारी रोजी सायंकाळी अटक करण्यात आली होती शिवाय आरोपीकडील दुचाकी चोरीची निघाल्याने या प्रकरणी स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या तरुणाविरोधात दहिगाव, ता.यावल येथील गुलाब कडु मिस्तरी-रुले यांनी अवैध सावकारीसह घरातील सामान नेल्याची तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमीत युवराज घारु यांच्याकडून मुलीच्या ऑपरेशनकरीता दिड वर्षापुर्वी 50 हजार रुपये व्याजाने घेतले व शंभर रुपयाचे स्टँप पेपरवर करारनामा लिहुन घेण्यात आला. या पैशांच्या मोबदल्यात आजवर एकूण एक लाख 35 हजार रुपये व्याजासह परत करण्यात आले मात्र सुमीत घारू याने पैसे पूर्ण मिळाले नाही, असे सांगत वेळोवेळी पैशांची मागणी केली व घरातून एलईडी टीव्ही, अँड्राईड मोबाईल, होम थिएटर, फ्रिज अशा वस्तू जबरीने नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे शिवाय तक्रार दिल्यास पाहुन घेईल, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. आरोपी (Sumit Youraj Gharu) विरोधात अवैध सावकारीसह खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील (PI Sudhir Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.
आरोपीची कोठडीत रवानगी
दरम्यान, समीर तडवी यांची दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.पी. 1075) चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्यात सुमित घारू विरोधात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात सुमीत घारू (Sumit Gharu) यास बुधवारी पोलिसांनी अटक केली. गुरूवारी येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एम.एस.बनचरे यांच्या न्यायासनापुढे घारू त्यास हजर केले असता त्याला 15 जानेवारीपर्यंत तीन दिवसाची पोलिस कोठडी (PCR) सुनावण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहेत.


