चारा घोटाळा : लालू प्रसाद यादवांचा पाच वर्षांच्या शिक्षेसह 60 लाखांचा दंड


रांची : देशभरात गाजलेल्या चारा घोटाळ्यातील पाचव्या प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासासह 60 लाखांचा दंड सुनावण्यात आला. डोरंडा कोषागारातून 139.35 कोटी रुपयांची रक्कम अवैधरीत्या काढल्याच्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने अन्य आरोपींना तुरुंगवासाव्यतिरिक्त 2 कोटींपर्यंतची शिक्षा सुनावली आहे.

तर लागू शकते निवडणूक लढवण्याची बंदी
शिक्षा ऐकल्यानंतर लालूंचा रक्तदाब वाढला. त्यांना रांची रिम्समध्ये दाखल करण्यात आले. या निकालाचा परिणाम लालूंच्या राजकीय कारकिर्दीवरही होऊ शकतो. दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्याने त्यांच्यावर सहा वर्षे निवडणूक लढवण्यासाठी बंदी लागू शकते. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशी यांनी 15 फेब्रुवारीला लालूंसह 38 आरोपींना दोषी ठरवले होते.





या चार प्रकरणांमध्ये लालूंना झाली आहे शिक्षा
लालूंना चारा घोटाळ्यातील चार इतर प्रकरणांत यापूर्वीच शिक्षा झालेली आहे. या सर्व प्रकरणांत ते जामिनावर आहेत. चाइबासामधील दोन आणि देवघर व दुमकाशी संबंधित चारा घोटाळा प्रकरणात झारखंड हायकोर्टाने त्यांना जामीन दिलेला आहे.

असे आहे नेमके घोटाळ्याचे प्रकरण
हे प्रकरण 1990-92 मधील आहे. डोरंडा कोषागारातून 139.35 कोटी रुपयांची रक्कम अवैधरीत्या काढल्याच्या या प्रकरणात जनावरांची कथितरीत्या स्कूटरवरून वाहतूक करण्यात आली. बिहारमध्ये चांगल्या वंशाच्या गायी व म्हशींची पैदास करण्यासाठी 400 बैल आणि रेड्यांची हरियाणा आणि दिल्लीहून स्कूटर- मोटारसायकलवर रांचीपर्यंत वाहतूक करण्यात आली.

सीबीआय, ईडी नेमकी आहे कुठे ? : तेजस्वी प्रसाद
बिहारमधील विरोधी पक्षनेते आणि लालूंचे पुत्र तेजस्वी प्रसाद म्हणाले की, एकट्या बिहारमध्ये 80 पेक्षा जास्त घोटाळे झाले आहेत. सीबीआय, ईडी आणि एनआयए कुठे आहेत? विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसीचा विसर पडला आहे. दुसरीकडे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले की, जे लोक तुमच्यासोबत (राजद) आहेत, त्यांनीच गुन्हा दाखल केला होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !