रेल्वे उशिरा धावली : भुसावळच्या प्रवाशाने ग्राहक मंचात तक्रार करताच मिळाली भरपाई
भुसावळ : गुवाहाटी रेल्वे स्थानकावरुन भुसावळात येण्यासाठी तिकिट आरक्षित केलेली गाडी सुमारे 9 तास उशिराने सुटली. या प्रकरणी भुसावळातील तक्रारदार प्रा.डॉ.डी.एम. ललवाणी यांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध जिल्हा ग्राहक मंचात तक्रार केली होती. प्रा.ललवाणी यांना झालेला मनस्ताप व त्रासापोटी रेल्वेने 25 हजार रुपये भरपाई व 3 हजार रुपये तक्रार खर्च असे 28 हजार रुपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक मंचाने दिले आहे.
तक्रारीनंतर प्रवाशाला मिळाला न्याय
भुसावळातील प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांनी 22 मे 2018 रोजी गुवाहाटी (आसाम) येथून भुसावळ येण्यासाठी गाडी क्रमांक 15648 या रेल्वेचे आरक्षण केले होते. ही गाडी दुपारी 3 वाजता गुवाहाटी रेल्वे स्टेशनवरून निघणे नियोजित होते. त्यामुळे ते आपल्या कुटुंबासह रेल्वे स्टेशनवर आले. मात्र, तेथे येऊन चौकशी केल्यावर त्यांना गाडी साडेसहा तास उशिराने निघेल, असे सांगण्यात आले. गाडीला विलंबाने धावत असल्याबाबत दुपारी 3 या नियोजित वेळेपूर्वी त्यांना भ्रमणध्वनीवर कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. यानंतरही गाडी प्लॅटफॉर्मवर आली नाही. यामुळे त्यांच्या समवेतचे सहप्रवासी नितीन छेडा हे तक्रार करायला गेले. त्यांना पुन्हा गाडी तीन तास उशिराने निघेल, असे उत्तर मिळाले त्यामुळे दुपारी तीन वाजता सुटणारी गाडी रात्री सुमारे 11.45 वाजता गुवाहाटी स्थानकावरून निघाली. यामुळे तक्रारदार प्रवासी, सोबत असलेला परीवार व सहप्रवाशांना मानसिक, आर्थिक व शारीरीक त्रास सहन करावा लागला.




अखेर ग्राहक मंचातून मिळाला दिलासा
याबाबत भुसावळ येथे परतल्यानंतर ललवाणी यांनी रीतसर लेखी तक्रार केली. त्याला उत्तर न आल्यामुळे त्यांनी वकिलामार्फत गुवाहाटी रेल्वेला रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवली पण रेल्वेने दखल न घेतली नाही. यामुळे त्यांनी जळगाव येथे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे 8 एप्रिल 2019 रोजी तक्रार केली. उभय पक्षाचा युक्तिवाद ऐकून ग्राहक आयोगाने तक्रारकर्ते प्रा.ललवाणी यांचे म्हणणे अंशत: मान्य करून त्यांना झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल 25 हजार व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी तीन हजार रूपये देण्याचे आदेश दिले. ग्राहक ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या प्रभारी अध्यक्षा पूनम मलिक व सदस्य सुरेश जाधव यांनी हे आदेश दिले. भुसावळ येथील अॅड.धिरेंद्र आर.पाल यांनी तक्रारदारातर्फे बाजू मांडली.