मित्राच्या पत्नीशी अनैतिक प्रेमसंबंध ; आधी भरला विम्याचा हप्ता नंतर केली हत्या !
अमरावती : मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंधात अडसर ठरणार्या मित्राचा थकीत विम्याचा आधी हप्ता भरीत नंतर गावाबाहेर त्याची गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना अमरावतीत घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.नरेश गणेश पवार (32) असे मारेकर्याचे नाव असून त्याला ग्रामीण पोलिसांच्या एलसीबी व कुर्हा पोलिसांनी अटक केली. आरोपी नरेशचे त्याच्या 40 वर्षीय मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याची तक्रार मृताच्या नातेवाइकांनीच दिली होती. त्याआधारे पोलिसांनी नरेशविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलिसांनी नरेशला ताब्यात घेतले असता त्याने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
विवाहितेशी होते अनैतिक संबंध
दुधाचा व्यवसाय करणार्या नरेश पवारचे मृताच्या 34 वर्षीय पत्नीसोबत अनैतिक संबंध होते व या संबंधात मृत अडसर ठरत असल्यामुळे त्याला संपवण्याचे काही दिवसांपासून नरेशच्या डोक्यात होते. त्याचा जीव घेण्याची त्याने व्यवस्थित योजना आखली.




दहा दिवसांपूर्वी भरला हप्ता
दहा दिवसांपूर्वी नरेशने मृताच्या बंद पडलेल्या जीवन विम्याचा साडेदहा हजार रुपयांचा हप्ता स्वत: भरला. ही बाब पोलिस तपासात समोर आली. घटनेच्या दिवशी रात्री अकरा वाजता नरेशने मित्राला सोबत घेतले व गावाबाहेर नेले. त्यानंतर नरेशने त्याचा गळा आवळून खून केला. घरी न आल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दुसर्या दिवशी सकाळी पोलिसांना त्याचा मृतदेहच आढळला होता.