श्री पांडुरंगराय पालखी सोहळ्याचे 23 मे रोजी मुक्ताईनगरकडे प्रस्थान

आदिशक्ती श्री संत मुक्ताई 725 वा अंतर्धान सोहळ्याची जय्यत तयारी


मुक्ताईनगर : टाळ, मृदुंगाचा गजर व विठ्ठलनामाचा जयघोष करीत श्री संत मुक्ताबाईंच्या 725 व्या अंतर्धान समाधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी पंढरीनिवासी श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री पांडुरंगराय पादुका पालखी सोहळ्याचे सोमवार, 23 मे रोजी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान होणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

विधीवत पूजा व आरती होणार
सोमवारी पहाटे सहा वाजता श्री पांडूरंगराय पादुकांची विधीवत पूजा व आरती होईल. हा सोहळा करमाळा, अहमदनगरमार्गे पहिल्या मुक्कामासाठी सायंकाळी औरंगाबाद मुक्कामी पोहोचणार आहे. सोहळा गारखेडा-औरंगाबाद येथील श्री गजानन महाराज मंदिरात मुक्कामी राहिल. मंगळवार, 24 मे रोजी भुसावळ येथे विठ्ठल मंदिर वॉर्ड येथे मुक्काम व बुधवार, 25 मे रोजी श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथे आगमन, दिंडी व दर्शन सोहळा, गुरुवार, 26 मे रोजी जुनी कोथळी ते नवीन मुक्ताई मंदिर पालखी व दिंडी सोहळा, शुक्रवार, 27 मे रोजी द्वादश पारणे, नैवेद्य व सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू होइल. सोहळा चिखली येथे मुक्कामी पोहोचेल. शनिवार, 28 मे बीड येथे मुक्काम, रविवार, 29 मे स्वस्थानी पंढरपूर येथे पालखी सोहळ्याची सांगता अशा स्वरूपात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर तर्फे पालखी सोहळ्याची रूपरेषा तयार करण्यात आली ाहे.

श्री पांडुरंगराय व संतांच्या भेटी
श्री पांडुरंगराय पादुका सोहळा मंगळवार, 24 मे रोजी दुपारी जामनेर, जि.जळगाव येथे पोहोचेल. श्री पांडुरंगराय व श्री क्षेत्र पंढरपूर येथून निघालेल्या संत नामदेव महाराज पादुका भेटीचा सोहळा होईल तर सायंकाळी सहा वाजता श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पादुकांचा भेटीचा सोहळा होईल. संत मुक्ताबाई महाराजांचा हा 725 वा अंतर्धान सोहळा असल्याने कौडण्यपूरहून माता रुक्मिणी, आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज व सासवडहून संत सोपानदेव यांच्या पादुका व विश्वस्थ मंडळ सोहळ्यासाठी उपस्थित राहिल, अशी माहिती श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली. यावेळी संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख हभप रवींद्र महाराज हरणे, श्री पांडुरंगराय पालखी सोहळा प्रमुख सूर्यकांत भिसे आदी उपस्थित होते.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !